मायणा-न्हावेलीतील फायबर कंपनीला आग

0
216

>> परिसरातील अनेकजण गुदमरले

साखळीमधील मायणा न्हावेली येथे गेली अनेक वर्षे बंद असलेल्या अमियांती या फायबर टँक बनवणार्‍या कंपनीत पडून असलेल्या टाक्यांना भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात नागरिक श्‍वास कोंडून गुदमरले. त्यामुळे त्यांनी घाबरून जवळच्या शेतात आश्रय घेतला. आग लागल्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. याची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली, वाळपई, फोंडा व म्हापसा येथील जवानांनी चार तास लागून आग आटोक्यात आणली.

ही आग दुपारी दीडच्या सुमारास प्रथम येथील गवताला लागली. त्यानंतर कंपनीच्या आत असलेल्या फायबरला लागून सर्वत्र धुराचे लोट पसरले. या धुराचा त्रास जवळच्या लोकांना झाला व त्यांनी शेतात धाव घेतली अशी माहिती न्हावेलीचे पंच दिगंबर नाईक यांनी दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने अग्निशामक दलाच्या जादा गाड्या पाठवल्या.

उपलब्ध माहितीनुसार सदर कंपनीच्या आवारात अनेक वर्षे मोठ्या प्रमाणात फायबर साठून ठेवलेले होते. त्यात विषारी घटक आहेत. आगीमुळे हे विषारी घटक धुराद्वारे गावात पसरले. दरम्यान, स्थानिकांनी कंपनीत असलेला टाकाऊ माल तातडीन हटवावा अशी मागणी केली आहे.