गोव्याचा धार्मिक सलोखा तसेच पर्यावरणाचे जतन करणे महत्त्वाचे असून गोमंतकीयांनी मोठ्या संख्येने जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपविरोधात मतदान करून भाजपच्या राज्यात फूट पाडणार्या राजकारणाचा पराभव करावा, असे आवाहन कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हा पंचायत उमेदवारांनी केले आहे.
दक्षिण गोव्यातील विविध मतदारसंघातील उमेदवारांनी रविवारी कॉंग्रेस प्रदेेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत, खासदार फ्रान्सिस सार्दिन तसेच दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष जोसेफ डायस यांची भेट घेऊन निवडणुकीची तयारी व रणनीती यावर चर्चा केली.
या बैठकीत जोसेफ वाझ (राय), रोमाना रॉड्रिग्ज (नुवें), सुझी फर्नांडिस (कोलवा), ज्युलियो फर्नांडिस (वेळ्ळी), रोयला फर्नांडिस(बाणावली), मुर्तजा ककनूर (दवर्ली), सोनिया फर्नांडिस (गिरदोली), मिशेल रिबेलो (कुडतरी), शाम भांडारी (सावर्डे), अभिजीत देसाई (रिवण), हर्षद गांवस देसाई (शेल्डे), राजेश वेळीप (खोला) व प्राची नाईक (कुर्टी) हे जिल्हा पंचायत उमेदवार उपस्थित होते.
येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीत दक्षिण व उत्तर गोव्यात कॉंग्रेसचाच झेंडा फडकेल, असा विश्वास सर्व उमेदवारांनी व्यक्त केला.