- शंभू भाऊ बांदेकर
आता भाजपचे बळ आणखी कॉंग्रेसच्या दहा आमदारांनी भाजपप्रवेश केल्यामुळे वाढले आहे. अर्थात यामुळे भाजपचे मतदार अधिक बळकट बनले आहेत की सत्तास्पर्धेसाठी पदनिष्ठा, तत्वनिष्ठा, बाजूला ठेवल्यामुळे भाजपचे ‘बळ’ ‘कट’ झाले आहे. याचा प्रत्यय निवडणुकीनंतरच येणार आहे.
सर्व राजकीय पक्ष जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तारखेच्या प्रतीक्षेत असतानाच जिल्हा पंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आणि सर्व राजकीय पक्षांसकट अपक्षांनीही निवडणुकीच्या लगबगीस सुरुवात केली. १५ मार्च रोजी जिल्हा पंचायत निवडणुका होतील, अशी घोषणा करण्यात आली व निवडणूक यंत्रणाही कामास लागली आहे.
२०१५ सालच्या जिल्हा पंचायत निवडणुकीच्यावेळी प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्री होते. यावेळी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारला अनेक ठिकाणी अनपेक्षित धक्के सहन करावे लागले होते, पण ज्याप्रमाणे गेल्या विधानसभेत कॉंग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळूनही मनोहर पर्रीकर यांनी मगो, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांची मोट बांधून स्वतः थेट मुख्यमंत्रिपदावर आरुढ झाले. त्याप्रमाणे भाजपने मगो व गोविपाच्या सहकार्याने जिल्हा पंचायती काबीज करण्याचा प्रयत्न केला होता. मी ‘जिल्हा पंचायत निवडणूकः शोध आणि बोध’ या शीर्षकाखाली एक लेख लिहून याबाबत ‘हे वागणं बरं नव्हे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तेव्हा एक ज्येष्ठ पत्रकार मला म्हणाले,‘अहो, जेथे भाजपा-पीडीपीमध्ये विळ्या-भोपळ्याचे ऐक्य असूनही जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सत्तारुढ होतो, तेथे मगो-गोविपा युतीत त्यांच्या हाती सत्ता आली तर त्याचा अव्हेर करण्याचा प्रश्न येतोच कुठे? अर्थात ज्या पक्षाचे सरकार असते त्या पक्षाच्या वळचणीला ‘विकासा’च्या नावाखाली सगळेच जातात ही गोष्ट आता गोव्याला नवीन नाही. मग ती निवडणूक ग्रामपंचायतीची असो, जिल्हा पंचायतीची असो, नगरपालिका-महानगरपालिकेची असो किंवा विधानसभेची असो. आता तर झेडपीच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविण्याचे जाहीर करण्यात आले आहे. भाजपाच्या प्रदेश अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर सदानंद शेट तानावडे यांनी पहिली घोषणा कोणती केली असेल तर जि.पं. निवडणुका पक्षीय पातळीवर लढविण्याची! जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तयारीला भाजपने अगोदरच सुरुवात केली असून या निवडणुकीत पक्षाला बहुमत प्राप्त होईल, असा विश्वासही श्री. तानावडे यांनी व्यक्त केला आहे. गोवा प्रदेशाध्यक्ष गिरिश चोडणकर यांनीही पक्ष पातळीवर निवडणुका घेतल्या जातील असे पत्रकार परिषदेत जाहीर केले असून त्यासंबंधीचा एकमुखी ठरावही प्रदेश कॉंग्रेस समितीने घेतला आहे. मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनीही आमचा पक्ष निवडणुकीला यशस्वीपणे सामोरा जाईल असे सांगितले आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी उत्तर व दक्षिण गोव्यात आमदार विनोद पालयेकर, आमदार जयेश साळगावकर यांच्यासह झेडपीच्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, तर सामना अधिक रंजक आणि रंगतदार होणार यात शंकाच नाही. विरोधकांचे पक्षीय पातळीवर तसे प्रयत्न चालू आहेत, त्याला कितपत यश येते हे पुढच्या आठवड्याभरात समजू शकेल. एक गोष्ट मात्र खरी की, ही जिल्हा पंचायत निवडणूक म्हणून आगामी विधानसभेच्या अंतिम फेरीपूर्वीची उपांत्यफेरी आहे. विरोधकांनी एकसंध राहून भाजपला एकाकी पाडण्याचा यशस्वी प्रयत्न केला तर त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीवरही नक्कीच उमटू शकतात. त्या दृष्टीने कालचे शत्रू आता मित्र बनून आपापल्या पक्षाचे भवितव्य घडवितात की आपापले उमेदवार निवडून आल्यानंतर ‘विकासा’चा बागुलबुवा करून राजकीय खेळी करतात हे कळण्यासाठी थोडे थांबावे लागेल.
याबाबत आपल्यासमोर ताजे उदाहरण आहे ते महाराष्ट्र राज्याचे- भाजप-शिवसेना महायुतीने निवडणुका हातात हात घालून लढवल्या आणि मुख्यमंत्रीपदावरून वाद निर्माण होताच त्यांच्या हातातून सत्ता निसटली. नाही म्हणायला ‘राष्ट्रवादी’च्या अजित पवारांनी आपली खेळी केली, पण ती त्यांच्या अंगलट आली. ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरदराव पवार यांनी आपल्या चाणाक्यनीतीचा वापर करून धनुष्यबाण, हात आणि घड्याळ यांचा त्रिवेणी संगम साधत सत्ता काबीज केली. अर्थात पवारांचा मुत्सद्दीपणा व राजकारणातील धुरंधरपणा गोव्याच्या राजकारण्यांशी अभावानेच असला तरी त्यांच्याकडून योग्य तो बोध घेऊन या निवडणुकीत एकसंधपणा कसा दाखवायचा याचा शोध लावला तर त्याचा सदुपयोग त्यांना अंतिम फेरीत करता येईल. हे काम दिसते तितके सोपे नसले तरी फार कठीण आहे, असेही नव्हे. पण त्यासाठी तुम्ही दोन पावले मागे हटा व आम्हीही दोन पावले मागे जातो, असा समंजसपणा दाखवूनच पुढे जाता येईल.
काही वेळा देशपातळीवर सुद्धा एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे जायचा विचार करताना विशेष रीत्या सक्रिय राहून ठोस पावले उचलण्याच्या बाबतीत गाफिल राहिल्यामुळे त्याची गत मग ‘नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे’ अशी होते, हे आपण पाहतच आहोत. त्यासाठी प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची किमया साधणे आवश्यक आहे. तसा भाजपही निवडणुकी संदर्भात गाफील राहिल, असे मुळीच समजून चालणार नाही. आता भाजपचे बळ कॉंग्रेसच्या दहा आमदारांनी पक्षप्रवेश केल्यामुळे वाढले आहे. अर्थात यामुळे भाजपचे मतदार अधिक ‘बळकट’ बनले आहेत की सत्तास्पर्धेसाठी पदनिष्ठा, तत्वनिष्ठा, बाजूला ठेवल्यामुळे भाजपचे ‘बळ’ ‘कट’ झाले आहे. याचा प्रत्यय निवडणुकीनंतरच येईल. मतदार सरकारपक्षाच्या बाजून आहेत कि एकसंध(!) बनलेल्या विरोधकांच्या बाजूने आहेत हे मतदारांतून स्पष्ट झाल्यानंतर विधानसभेचे आडाखे बांधले जाणार आहेत.
दरम्यान आमदार अपात्रता मालिकांवर १३ व १४ फेब्रुवारीला सुनावणी होणार असल्याच्या नोटिसा सभापती राजेश पाटणेकर यांनी जारी केल्या आहेत. त्याचा निवाडा जि. पं. च्या निवडणुकांपूर्वी लागला, तर त्याचाही बरा-वाईट परिणाम मतदारांवर होऊ शकतो, याकडेही डोळेझाक करून चालणार नाही.
आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधावेसे वाटते, ते म्हणजे नुकतेच गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. गिरीश चोडणकर यांनी राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायत निवडणुकांची तारीख बदलण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे असे की, प्रभाग राखीवता निश्चित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्याची पूर्तता अजून झालेली नाही. ती मागणी धसास लावून मग निवडणुका घेण्यात याव्यात. एकूण काय, तर सर्व पक्ष सर्व बाजूंनी उपांत्य फेरीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत. त्यावरून अंतिम फेरीच्या सर्कशीची प्यादी खेळवली जाणार आहेत यात शंका नाही.