जानेवारीपासून प्लॅस्टिक बंदीची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी : काब्राल

0
93

>> गोवा प्लॅस्टिकमुक्त राज्य जाहीर करणार

राज्यात प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी १ जानेवारी २०२० पासून टप्प्या टप्प्याने केली जाणार असून प्लॅस्टिक बंदीच्या कार्यवाहीसाठी नियमावली डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

राज्यात प्लॅस्टिक उत्पादन आणि वापराला बंदी करणार्‍या गोवा नॉन बायोडिग्रेडेबल कचरा (नियंत्रण) दुरुस्ती विधेयकाला गोवा विधानसभेत पावसाळी अधिवेशनात मंजुरी देण्यात आली. गोवा राज्य हे प्लॅस्टिक मुक्त राज्य म्हणून जाहीर करण्यात येणार असून प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी १ जानेवारी, २०२० पासून केली जाणार आहे.

प्लॅस्टिकच्या पिशव्या व प्लॅस्टिकपासून वस्तू तयार करणारे उत्पादक आणि वापर करणार्‍यांना दंड किंवा कारावासाच्या शिक्षेची तरतूद विधेयकामध्ये आहे. राज्य सरकारने एका आदेशाद्वारे सरकारी कार्यालय आणि सरकारी कार्यक्रमात प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचा आदेश जारी केलेला आहे.राज्यात प्लॅस्टिक बंदीच्या कार्यवाहीसाठी नियमावली तयार केली जाणार आहे. नियमावली तयार करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. प्लॅस्टिक उत्पादन करणार्‍या व्यावसायिकांनी प्लॅस्टिकच्या विल्हेवाटीची जबाबदारी स्वीकारण्यासाठी ईपीआर धोरण तयार केले जाणार आहे. प्लॅस्टिकच्या एकेरी वापराबाबत नियमावली जाहीर केली जाणार आहे.