>> महापौर; निविदेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
महानगरपालिका क्षेत्रातील काही विभागात पे पार्किंग व्यवस्था सुरू करण्यासाठी निविदेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून येत्या जानेवारी २०२० पासून पे पार्किंग योजना सुरू केली जाऊ शकते, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणण्यासाठी प्रमुख रस्त्यावर पे पार्किंग योजना सुरू करण्यासाठी निविदा जारी केली होती. केवळ एकाच ठेकेदाराने निविदा दाखल केल्याने निविदा स्वीकारण्यासाठी १० दिवसांचा कालावधी वाढविण्यात आला होता. मंगळवार १७ डिसेंबरला वित्तीय बोली उघडण्यात येणार आहे. त्यानंतर ठेकेदार निश्चित करून आवश्यक करार केला जाणार आहे, असे महापौर मडकईकर यांनी सांगितले.
ओल्या कचर्यापासून गॅस निर्मिती
महानगरपालिका क्षेत्रात सांतइनेज परिसरात ओल्या कचर्यापासून गॅस तयार करणारा एक प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. मिरामार येथे ३०० किलो क्षमतेचा ओल्या कचर्यापासून गॅस निर्मिती करणार्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. महानगरपालिका क्षेत्रात ओल्या कचर्यापासून गॅस निर्मिती करणारे ६ प्रकल्प कार्यान्वित करण्याचा मानस आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त संजीत रॉड्रीग्स यांनी दिली.
महानगरपालिका क्षेत्रात ओल्या कचर्याची स्थानिक पातळीवर विल्हेवाट लावण्यावर भर दिला जात आहे. महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी १०२ कचर्यापासून खत तयार करणारे युनिट कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. शहरातील सुमारे १५ टन ओल्या कचर्याची या खत निर्मिती युनिटच्या माध्यमातून विल्हेवाट लावली जात आहे. सुका कचरा गोळा व विल्हेवाटीसाठी ९ केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहे, असेही आयुक्त रॉड्रीग्स यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या एका शिष्टमंडळाने सामंजस्य कराराअंतर्गत क्रोएशिया या देशाला नुकतीच भेट दिली. तेथील कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था व इतर कामांची पाहणी करण्यात आली आहे. असे मडकईकर यांनी सांगितले.