नागरिकत्व विधेयकाबाबत जनतेत विरोधकांकडून चुकीची माहिती ः सावईकर

0
179

नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्यावरून कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्ष देशातील जनतेमध्ये चुकीची माहिती पसरवत असून त्यामुळेच विविध ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे भाजप नेते व माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

अफगाणिस्तान, बांगलादेश व पाकिस्तान या देशातील धर्मछळ सहन करावा लागणार्‍या अल्पसंख्याकांचे सबलीकरण करण्यासाठीच केंद्रातील भाजप सरकारन नागरिकत्व दुरुस्ती कायदा केला असल्याचे सावईकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. धर्मछळाला कंटाळून अफगाणिस्तान, बांगलादेश व पाकिस्तानसह एकूण दहा देशांतून आश्रीत म्हणून भारतात आलेल्या अल्पसंख्याकांचे या कायद्यामुळे सबलीकरण होणार असल्याचे सावईकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

कॉंग्रेस पक्षाने सुमारे ५० वर्षे देशावर राज्य केले. मात्र, या ५० वर्षांच्या काळात कॉंग्रेस पक्षाने फक्त मतांचे राजकारण केल्याचा आरोप सावईकर यांनी यावेळी केला. कॉंग्रेसने विकास केला नाही तसेच इतिहासात झालेल्या चुकांची दुरुस्ती कधीच केली नाही. मोदी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याद्वारे इतिहासात झालेल्या एका चुकीची दुरुस्ती घडवून आणल्याचे सावईकर म्हणाले.

ख्रिस्ती समाजावर वाईट परिणाम नाही
नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकाचा गोव्यातील अल्पसंख्य असलेल्या ख्रिस्ती समाजावर कोणताही वाईट परिणाम होणार नसून कॉंग्रेस पक्ष विनाकारण तसा आरोप करीत असल्याचे सावईकर यांनी यावेळी नमूद केले. नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकावरून जे कोणी देशामध्ये फूट घालू पाहत आहेत त्यांच्यावर केंद्र सरकारने कारवाई करावी, अशी मागणी आम्ही करीत असल्याचे ते म्हणाले. एका पक्षाचे उत्तर देताना २०१४-१५ पासून नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू होती, अशी माहितीही सावईकर यांनी दिली.