जागृतीसाठी चित्रपट प्रभावी माध्यम

0
142

>> प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सुभाष घईंचे मत

चित्रपट हे लोकांमध्ये जागृती घडवून आणणारे प्रभावी माध्यम आहे. एखादी कथा सांगता सांगता लोकांना चांगला संदेश देणे हे या माध्यमाचे काम असून त्याद्वारे लोकांमध्ये जागृती घडवून आणण्याचे काम प्रभावीपणे या देशात करण्यात आले असल्याचे ख्यातनाम हिंदी चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी काल येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
एखादा चांगला चित्रपट हा लोकांना दिशा दाखवण्याचे काम करतो. ४० ते ५० या दशकात देशासाठी बलिदान देण्याचा संदेश चित्रपटांनी दिला. ५० ते ६० या दशकात कुटुंबासाठी त्याग करणार्‍या लोकांचे जीवन चित्रपटांतून दाखवण्यात आले. त्यानंतर आदर्शवाद, त्यानंतर हिंसा व अन्यायाविरूद्धची लढाई असा सिनेमा बदलत गेल्याचे घई यांनी सांगितले. ९० च्या दशकात प्रेमपटांची मोठी लाट आली. त्यानंतर पालकांविरूद्ध केलेले बंड या विषयांवरील चित्रपट बनवले जाऊ लागले. सध्या लग्नाऐवजी मैत्रीवर जास्त भर देणार्‍या पात्रांवर तसेच आत्मशोधात निघालेली युवा मंडळी यांना केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनवले जात असल्याचे घई यांनी सांगितले.
सिनेमाने भारतभरातील लोकांना एकत्र आणण्याचे कामही केले. सिनेमामुळेच एका प्रदेशातील भाषा दुसर्‍या प्रदेशातील लोकांपर्यंत पोचली. पंजाबी, मराठी, बंगाली आदी प्रादेशिक भाषा चित्रपटांमुळे लोकप्रिय झाल्या. वेगवेगळ्या राज्यांतील संस्कृतीचा प्रसारही चित्रपटांमुळे झाल्याचे ते म्हणाले.
…म्हणून चरित्रपट
सध्या मोठ्या प्रमाणात चरित्रपट का बनवले जाऊ लागले आहेत या प्रश्‍नावर बोलताना लोकांना प्रेरणा देऊ शकतील असे लोक सध्या नाहीच. त्यामुळे यापूर्वीच्या ज्या लोकांनी प्रेरणादायी काम केले त्यांच्यावर चरित्रपट तयार केले जाऊ लागले असून ते लोकांना आवडू लागल्याचे घई म्हणाले.
थ्रीडीसह जे नवनवे तंत्रज्ञान विकसित होऊ लागलेले आहे त्यामुळे चित्रपट बनवताना कथेपेक्षा तंत्रज्ञानालाच जास्त महत्त्व दिले जात असल्याविषयी त्यांना विचारले असता तंत्रज्ञानापेक्षा कथाच महत्त्वाची असते. कारण कथेद्वारेच मानवी भावना व्यक्त करता येत असतात, असे घई यांनी स्पष्ट केले.