जलस्रोत खात्यातर्फे आता ‘नितळ गोंय, नितळ बांय’

0
112

जीवनात पाण्याला सर्वाधिक महत्व असल्याने पाण्याचे स्रोतांचे संवर्धन करण्याच्या हेतूने जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी काल मांडवी हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत जीवन क्रांतीच्या संकल्पनेवर ‘नितळ गोंय नितळ बांय’ या योजनेचा शुभारंभ केला.
वरील योजनेखाली खाजगी मालकीच्या तसेच सार्वजनिक वापरात असलेल्या विहीरींचे जतन करण्यासाठी प्रती विहीरीसाठी ५० हजार रुपयेपर्यंत मदत केली जाईल, असे जलस्रोत मंत्र्यांनी सांगितले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक विहीरीची जलस्रोत खात्यात नोंदणी करणे आवश्यक आहे. खात्यातर्फे अशा विहीरींची नियमित तपासणीही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. आपल्या सरकारने ‘गोंय आणि गोंयकारपण’ कार्यक्रमाखालीच वरील योजना तयार केल्याचे नगर नियोजन मंत्री सरदेसाई यांनी सांगितले.
राज्यातील झर्‍यांचे संवर्धन करण्याचाही प्रयत्न असेल. केंद्र सरकारने राज्यातील झर्‍यांचा तपशिल मागविला आहे. तो गोळा करण्याचे काम चालू असून महिन्याभरात तपशिल केंद्राला सादर करणार असल्याचे जलस्रोत खात्याचे संचालक नाडकर्णी यांनी सांगितले. केंद्र सरकार जलसंवर्धनासाठी योजना तयार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.