Home Featured जरा लाज बाळगा!

जरा लाज बाळगा!

0

कला अकादमीत नुकत्याच सादर झालेल्या एका नाट्यप्रयोगावेळी प्रकाशयोजनेत घोळ झाल्याने दहा मिनिटे प्रयोग बंद ठेवण्याची वेळ ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांच्यावर ओढवली. एखाद्या नाट्यप्रयोगामध्ये कलाकार जीव ओतून काम करत असताना, अशा एखाद्या तांत्रिक बिघाडामुळे पडदा पाडायची वेळ येते, तेव्हा कलाकारांना काय यातना होत असतील ह्याची कल्पना आपण करू शकतो. ‘पुरूष’ नाटकावेळी हे जे घडले ते केवळ प्रातिनिधिक आहे. कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर मूळच्या सुंदर परिपूर्ण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ केला गेला आहे हेच प्रत्येक निष्ठावान रंगकर्मी सातत्याने सांगतो आहे. कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या नावाखाली ही जी काही तिची विल्हेवाट लावली गेली आहे, ती गोमंतकीय कलाकारांच्या आणि रसिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडची आहे. पण इतके होऊनही संबंधित राज्यकर्त्यांची भूमिका तर ‘लाज कोळून पिणे’ म्हणतात त्या पातळीला जाऊन पोहोचली आहे. सरकार मौन पत्करून झाल्या प्रकाराची जबाबदारी न स्वीकारता नामानिराळे राहू शकत नाही. कला अकादमीत हे काय चालले आहे? ध्वनीयंत्रणा, प्रकाशयोजना हे कोणत्याही नाट्यगृहाचे मुख्य घटक. कला अकादमीतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये नूतनीकरणाच्या नावाखाली त्याचाच सत्यानाश केला गेला आहे. डिस्को आणि डान्स बारमध्ये लावायचे एलईडी दिवे ह्या नाट्यगृहात लावले गेले आहेत. ध्वनीयंत्रणा हा कोणत्याही नाट्यगृहाचा प्राण, परंतु कला अकादमीतील नव्या सुमार ध्वनीयंत्रणेमुळे बाहेरची यंत्रणा आणून कार्यक्रम करण्याची पाळी खुद्द कला अकादमीवरच येते आहे. ज्या कला अकादमीच्या वास्तूचा गोमंतकीयांना अभिमान वाटे, त्या वास्तूमध्ये नूतनीकरणानंतर गळती लागते आणि सारवासारव करताना छतावर पालापाचोळा साठला, वातानुकूलीन यंत्रणेतून पाणी झिरपले अशी मल्लीनाथी होते या सगळ्याला काय म्हणायचे? काही काळापूर्वी कला अकादमीच्या दुरवस्थेविरुद्ध कलाकारांनी दंड थोपटल्यावर सरकारने विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली कृतीदल नियुक्त केले. त्याचा अंतिम अहवाल अजून आलेला नाही. कृतीदलाने त्रुटी दाखवताच काही लाचार कलाकारांची सोनेरी टोळी कला व संस्कृती मंत्र्यांच्या समर्थनार्थ उभी झाली होती. नाट्यगृहात सध्या ज्या त्रुटी दिसत आहेत, त्याबाबत ह्या मंडळींचे काय म्हणणे आहे? आता सरकारने नाट्यगृह दुरुस्तीसाठी म्हणे तीन सल्लागारांची नियुक्ती केली आहे. मूळ कंत्राटात ज्या अटी व शर्ती होत्या, त्यांची पूर्तता कंत्राटदाराकडून झालेली नसेल तर ती कामे त्याच्या खर्चाने करून घेणार, नपेक्षा नवी कामे सरकार आपल्या खर्चाने करणार आहे. म्हणजे आधीच पन्नास कोटींचा चुराडा केल्यानंतर आता आणखी काही कोटींचा चुराडा करायला सरकार निघाले आहे. मुळामध्ये कला अकादमी नूतनीकरणाचे काम विनानिविदा नामांकन पद्धतीने दिले गेले त्याची ही सगळी फळे आहेत. हे काम विनानिविदा विशिष्ट एजन्सीला देण्याचे कर्म कोणाचे ह्याविषयी ह्यापूर्वी कला आणि संस्कृती मंत्री आणि तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यात टोलवाटोलवी चालली. शेवटी मंत्रिमंडळ बैठकीतील हा सामूहिक निर्णय असल्याची मल्लीनाथी त्यावर करण्यात आली. आता कला अकादमीच्या संदर्भात जे चालले आहे त्याची जबाबदारी कोण घेणार? कोणीतरी ह्या चाललेल्या बेबंदशाहीची जबाबदारी घ्यायला नको काय? कला अकादमीच्या वास्तूचे दिवसेंदिवस जे धिंडवडे काढले जात आहेत, त्याची थोडी तरी शरम संबंधितांनी बाळगावी. कला अकादमीची मूळ इमारत पन्नास पावसाळे पाहूनही ताठ मानेने आजवर उभी होती. नूतनीकरण झालेली वास्तू पाच पावसाळे तरी सुरळीत काढील का ह्याची शंका आहे. लवकरच पावसाळा येऊ घातला आहे. पुन्हा नाट्यगृहात गळती लागणार नाही ह्याची काय हमी? कला अकादमी म्हणजे केवळ भाड्याचे थिएटर नव्हे. तो गोमंतकाचा सांस्कृतिक मानबिंदू आहे ह्याची मुळात जाण हवी. तेथील मुख्य नाट्यगृह, कृष्णकक्ष, चित्रदालन, इतकेच काय, तिथली हिरवळ, तिथले उपाहारगृह, मधले चौक, तिथल्या बैठका ह्या सगळ्यांना एक स्वतःचे व्यक्तिमत्त्व आहे. पूर्वीच्या वास्तूत ते जपले गेले होते. नव्या वास्तूमध्ये केवळ डागडुजी झाली आहे. मूळ वास्तूचे आंतरिक सौंदर्य हरवले आहे. नूतनीकरणातील त्रुटींनी तर ह्या वास्तूचा आत्माच काढून घेतला आहे. रसिकांच्या कलानंदात अडथळा आणणाऱ्या त्या त्रुटी लवकरात लवकर दूर तर झाल्याच पाहिजेत, परंतु ह्या त्रुटींना जबाबदार कोण हेही उजेडात आले पाहिजे. कोट्यवधींच्या नूतनीकरणातील घोळावर असा सहजासहजी पडदा टाकता येणार नाही. त्याची जबाबदारीही जरूर निश्चित व्हावी. त्याला त्याची शिक्षा मिळायला नको?