जय गंगे भागीरथी

0
511
  •  डॉ. सोमनाथ कोमरपंत

तिन्हीसांजेला गंगाकिनारी ‘गंगाआरती’ होते; नदीपात्रात ‘दीपदान’ केले जाते. ते पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. मनातील उदात्त भाव जागे होतात. पण या ‘आरती’त जर आर्तता नसेल आणि तिच्या रक्षणासाठी ‘नेत्रांची निरांजने’ जोवर तेवणार नाहीत तोपर्यंत सारे व्यर्थ आहे.

‘नदीचे सूक्त’ आणि ‘साहित्यातील नदीवर्णन’ या लेखांत गंगा नदीचा उल्लेख होणे अपरिहार्य होते. पण भारतवर्षाची भाग्यरेषा प्राचीन कालापासून खुलविणारी जीवनदायिनी म्हणून तिचा विशेषत्वाने विचार व्हायला हवा असे वाटते. गंगेला केवळ नदी न मानता गंगासागर म्हणणे प्रशस्त वाटते. पावित्र्य, उपयुक्तता आणि संस्कृतिसंचिताची समृद्धी यांचा त्रिपुटीसंगम असलेला भारतातील सर्वश्रेष्ठ असा नदीप्रवाह. केवळ नदी न म्हणता नदीप्रवाह म्हणण्याने या महास्रोताचे प्रवाहित्व आपल्या नजरेच्या कक्षेत येते. तिच्या उगमापासून संगमापर्यंत केवढा मोठा भूभाग तिने व्यापलेला आहे.

कमीत कमी उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्‍चिम बंगाल या तीन राज्यांतील लोकांचे जीवन तिच्या जलपात्रावर अवलंबून आहे. कृषिप्रधान पट्‌ट्यातील येथील जमीन गंगा नदीच्या प्रवाहामुळे धनधान्याने समृद्ध व्हायला मदत झालेली आहे. भगीरथाने खडतर तपश्‍चर्या करून तिला स्वर्गातून पृथ्वीतलावर आणले अशी मिथ्यकथा प्रचलित आहे. तिच्यामुळेच शतकानुशतके तिच्या काठावरील लोकांचे भाग्य फळफळले.

गंगेचा प्रवास कोठून सुरू झाला? ती कोणकोणत्या दिशांकडे वळली? तिला कोणकोणत्या नद्या वाटेत येऊन मिळाल्या? तिचे पात्र विस्तारत जाऊन तिने त्रिभुज प्रदेश कसा निर्माण केला आणि दोन हजार पाचशे दहा किलोमीटर लांबीची आणि ८,३८,२०० चौरस किलोमीटर जलवाहन क्षेत्र असलेली ही नदी बंगालच्या उपसागरापर्यंत कोणत्या प्रकारचा प्रवास करून आली तिचे विहंगमावलोकन करणे अगत्याचे आहे. गंगेचा उगम उत्तर प्रदेशाच्या पश्‍चिम कुमाऊँ परिसरात टेहरी- गढवाल जिल्ह्यातील ४,०६२ मीटर उंचीच्या गंगोत्री या क्षेत्रापासून सुमारे २९ किलोमीटरवरील ४,२०६ मीटर उंचीवरील गोमुख येथे गंगोत्री हिमनदीच्या टोकाशी हिमगुहेतून होतो. भारतीय परंपरेनुसार तिला विष्णुपदी, त्रिपथगा, भागीरथी, जान्हवी इत्यादी अनेक नावे आहेत. तिला उद्देशून ‘स्रोतसामस्मिजान्हवी’ असे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटले आहे. गंगातीरी आपला मृत्यू व्हावा आणि दहन व्हावे असे हिंदू मनाला वाटते. ‘भागीरथी’ या उगमस्थानापासून ३५ कि.मी. पश्‍चिमेकडे आणि मग हिमालयाच्या रांगांतून, खोल दर्‍यांतून १४० कि.मी. दक्षिणेकडे गेल्यावर तिला देवप्रयाग येथे अलकनंदा हा गंगेचा दुसरा शीर्षप्रवाह मिळतो. बद्रिनाथ गावाच्या मागे सतोपंथ व भगीरथरवोरक हिमनद्यांच्या जिव्हेतून नंदादेवीच्या उत्तरेस, तिबेटच्या सरहद्दीजवळ अलकनंदेच्या शीर्षप्रवाहाचा उगम होतो. जोशीमठ येथे बद्रिनाथकडून आलेली विष्णुगंगा आणि द्रोणगिरीकडून आलेली धौलीगंगा एकत्र येतात व विष्णुप्रयागनंतर तिला ‘अलकनंदा’ म्हणतात. तिला कर्णप्रयाग येथे पिंडरगंगा व रुद्रप्रयाग येथे मंदाकिनी येऊन मिळते. देवप्रयागनंतर भागीरथी- अलकनंदा या संयुक्त प्रवाहाला ‘गंगा’ हे नाव प्राप्त होते. मग दक्षिणेकडे ७० कि.मी. प्रवास करून नाग टिब्बा व शिवालिक रांगांतून खडक फोडून, वाट काढीत हृषिकेशवरून हरद्वार येथे गंगा मैदानी प्रदेशात उतरते. हरद्वारचा तिचा शुभ्रफेसाळ प्रवाह पाहताना तिच्या अंगात सौदामिनीचा संचार झाला आहे की काय असे वाटायला लागते. आपल्याही अंगात चैतन्यप्रवाह जागा होतो. ते दृश्य खरोखरच नेत्रदीपक आहे. लक्ष्मणझुल्यावरून तिच्या या आवेग-प्रवेगाकडे एकतानतेने पाहावे. निमिषार्धात आपण आपले न राहता त्या प्रवाहाचे अविभाज्य भाग बनून जातो. मानसिक पातळीवर तिच्या दोन्ही काठांवरचा संस्कृतिप्रवाह उभा राहतो आणि जाणिवेच्या पातळीवर तिचा प्रमत्त प्रवाह उभा राहतो. स्वर्गीय सुखाची संकल्पना येथे साकार होते, एवढे तिचे तेथील दर्शन आल्हाददायी वाटते.

हरद्वारहून गढमुक्तेश्‍वरावरून अनूप शहरापर्यंत गंगा दक्षिणेस तेथून फरुखाबाद, कनौज, कानपूरवरून अलाहाबाद (प्रयाग) पर्यंत अग्नेयीकडे, मग दक्षिणेकडून चंद्राकृती वळण घेऊन वाराणसीपर्यंत आणि तेथून गाझीपूर, बलिया, पाटणा, मोंघीर, भागलपूर, साहेबगंजवरून पश्‍चिम बंगालच्या सरहद्दीपर्यंत सामान्यतः पूर्वेकडे सुमारे १२० कि.मी. वाहत जाते. बिहारमधील राजमहाल टेकड्यांना वळसा घालून गंगा पश्‍चिम बंगालमध्ये प्रवेश करते. तिथे ती आग्नेय दिशेने प्रथम त्याच्या पश्‍चिम सीमेवरून त्याचा चिंचोळा भाग ओलांडून पूर्वसीमेवरून व मग त्याच सीमेवरून दक्षिणेकडे सुमारे ४० कि.मी. गेल्यावर पुनश्‍च आग्नेय दिशेने बांगला देशात जाते. ग्वलंदोजवळ तिला ब्रह्मपुत्रा येऊन मिळते व मग ती ‘पद्मा’ या नावाने वाहते. पुढे फरीदपूरच्या पूर्वेस मेघनेच्या खाडीला मिळून दक्षिण या बेटाजवळ बंगालच्या उपसागरास मिळते. तिच्या अथक प्रवासाची कृतकृत्य भावनेने सांगता होते. तिच्या या परिश्रमांची फलश्रुती म्हणजे तिचे असंख्य शाखाप्रवाह होऊन जगातील सर्वांत विस्तीर्ण ५८,७५२ चौ.कि.मी. क्षेत्रफळाचा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. त्याच्या दक्षिण तीरावर अनेक बेटे तयार झाली असून तेथे समुद्राला मिळणार्‍या प्रवाहांच्या मुखास ‘गंगेची मुखे’ म्हणतात. हा प्रदेश अरण्यमय आणि दलदलीचा. सुरुवातीला उगमाकडे ती भागीरथी आणि संगमापर्यंत सर्वांचे भाग्य खुलवीत आलेली ती ‘भाग्यरथी.’ समर्पणशील. कृतार्थ जीवन जगणारी.

वाराणसी अथवा काशी हे गंगेच्या काठावरील आज अस्तित्वात असलेले अत्यंत प्राचीन शहर. बनारस या नावाने आज ओळखले जाणारे. भारतातील सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र. तेथील गंगेच्या विस्तीर्ण प्रवाहामुळे त्या क्षेत्राला महत्ता आणि विलोभनीय सौंदर्य प्राप्त झाले आहे. तिच्या काठावर वसलेल्या दशाश्‍वमेध घाट, पद्ममङ्‌ग्न घाट, हरिश्‍चंद्र घाट, त्रिपुरी भैरवी घाट, नर्मदा घाट, अहिल्या घाट आणि मणिकर्णिका घाट या घाटांमुळे या नदीपात्राचे सौंदर्य खुललेले आहे. या घाटांची संख्या चौसष्ट आहे. आपल्या मनातील भाविकतेचा तो परमोत्कर्ष आहे. गंगेच्या पावनत्वाविषयी वाटणार्‍या श्रद्धेतून हे सारे निर्माण झाले आहे. तेथे असलेले श्री काशी विश्‍वेश्‍वराचे मंदिर आणि नंतरचे श्री काशी विश्‍वनाथाचे मंदिर ही प्रेक्षणीय आणि श्रद्धेय स्थाने आहेत.

१९६९ साली न्यू इरा हायस्कूलमध्ये अध्यापनास प्रारंभ केल्यावर ‘राष्ट्रीय एकात्मता सप्ताहा’च्या निमित्ताने प्रयागतीर्थी राहता आले. तेथील गंगा-यमुना संगम पाहता आला. ओझरती बनारस भेट घडली. ते होते पहिले-वहिले गंगादर्शन. त्यानंतर २०१६ मध्ये हृषिकेश, हरद्वार आणि बनारस येथील गंगा नदी आणि गंगाप्रवाहाची विलोभनीय रूपे सहकुटुंब, सहपरिवार मनसोक्तपणे अनुभवता आली. बनारसच्या तीन दिवसांच्या मुक्कामात तेथील स्थळयात्रा घडली. ‘बनारस हिंदू विश्‍व विद्यालया’चा भव्य परिसर पाहता आला. नदीपात्रातून नौकाविहार करता आला. हे सारे अनुभवत असताना भारताच्या प्राचीन इतिहासाची संस्मरणे मनात जागी झाली. अर्थातच भारताचे पहिले पंतप्रधान आणि प्रख्यात इतिहासतज्ज्ञ पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या त्यांच्या सुप्रसिद्ध ग्रंथातील गंगेविषयीचे उद्गार आठवतात ः
‘‘भारताचे हृदयच जिने आपल्या अंकित करून ठेवले आहे आणि इतिहासाच्या उदयकालापासून कोटी-कोटी भारतीयांना जिने आपल्याकडे आकर्षित करून घेतले आहे, ती भारताची सर्वश्रेष्ठ नदी गंगा… उगमापासून सागरापर्यंतची आणि प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतची गंगेची कथा म्हणजे भारताची सभ्यता व संस्कृती, साम्राज्यांचा उदय आणि अस्त… भारतीय विचारांना मग्न करून टाकणारा मनाचा शोध, जीवनाची परिपूर्ती… त्यातील अस्वीकार आणि त्याग… जीवन आणि मृत्यू यांची कथा आहे.’’
इतिहासाच्या परिप्रेक्ष्यात आधुनिक भारताच्या स्वप्नांकडे झेप घेण्याची प्रज्ञा आणि प्रतिभा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे होती म्हणून जलाशयांवर आधारलेले प्रकल्प उभारून आधुनिक भारतात नवनिर्माणाची प्रक्रिया ते सुरू करू शकले.

पंडित मदन मोहन मालवीय यांच्या द्रष्टेपणामुळे मठ-पीठांच्या जोखडातून बनारस मुक्ततेच्या मार्गावर आले आणि त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या नव्या विश्‍वविद्यालयाच्या कोनशिलेवर भारतीय जनता आधुनिक जगाची स्वप्ने पाहू शकली. त्यांचा स्वतःचा आणि बनारस हिंदू विश्‍वविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या तरुणांचा भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील सहभाग आणि त्यानंतर स्वीकारलेला विधायक मार्ग पाहता त्यांची धारणा कोणत्या प्रकारची होती हे लक्षात येते. तत्कालीन ध्येयवादाचे स्वरूप आता तिथे राहिलेले नाही. तेथील वातावरणातील बदलते अंतःप्रवाह पाहून मनाला क्लेश होतात.
दुसरी अंतःकरणाला वेदना करणारी बाब म्हणजे अंधश्रद्धेमुळे गंगाप्रवाहाला आलेले मलीन स्वरूप. ‘मरणं मंगलं यत्र|’ ही उक्ती लोकमानसाने एवढी मनावर घेतली आहे, तिच्या काठावरच प्रेते जाळली जातात. तेथे निर्माण झालेली प्रदूषणप्रक्रिया थोपविणे हे तेथील राज्यशासनाच्या आटोक्यापलीकडची बाब होऊन बसली आहे. परंपरागत रूढिग्रस्तता, धार्मिकतेच्या नावाखाली चालणारी कर्मकांडे आणि यालाच आचार-विचार मानणारी मानसिकता आधुनिक समाजात बोकाळत चाललेली आहे. त्याचे सर्वग्रासी स्वरूप गंगाकिनारी सर्रास पाहायला मिळते.

औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे दिल्लीला यमुना नदीला अवकळा आलेलीच आहे, तीच अवस्था बनारसजवळच्या नीलांग गंगाप्रवाहाची भविष्यकाळात होणार नाही ना, या विचाराने पोटात गोळा उठतो. केंद्रशासनाने गंगेच्या प्रदूषणाची लाट थोपविण्यासाठी युद्धपातळीवर योजना कार्यान्वित केल्या आहेत; पण जनमानसात जागृतीची लाट यासंदर्भात निर्माण झाल्याशिवाय सारे प्रयत्न वाया जाणार आहेत. यासाठी वेळीच दक्षता घ्यायला हवी. गतिमान युगमानसानुसार आपण कर्मकांडप्रधान आचारधर्म बदलायला हवा. आपला दृष्टिकोन बदलायला हवा. जीवनशैली बदलायला हवी. गंगेच्या काठावर ज्या प्रमाणात प्रेते जाळली जातात, त्या जाळामुळे आसपासच्या जैवविविधतेचा नाश होईल. तेथे दिसणारे आजचे भयाण वास्तव मन उद्विग्न करणारे आहे.

तिन्हीसांजेला गंगाकिनारी ‘गंगाआरती’ होते; नदीपात्रात ‘दीपदान’ केले जाते. ते पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. मनातील उदात्त भाव जागे होतात. पण या ‘आरती’त जर आर्तता नसेल आणि तिच्या रक्षणासाठी ‘नेत्रांची निरांजने’ जोवर तेवणार नाहीत तोपर्यंत सारे व्यर्थ आहे.