जम्मू-काश्मीरमध्ये विकासाचे नवे युग अवतरले ः अमित शहा

0
30

जम्मू-काश्मीरमध्ये विकासाचे नवे युग अवतरले आहे. जम्मूविषयी आधी अन्याय आणि भेदभाव होत होता. पण आता जम्मू, काश्मीर आणि लडाख यांचा समान विकास होण्यासाठी प्रशासन बांधील आहे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सांगितले. गृहमंत्री अमित शहा सध्या तीन दिवसांच्या काश्मीर दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान काल रविवारी त्यांच्या हस्ते काश्मीरमधील आयआयटी संस्थेच्या कॅम्पसचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच अमित शाह जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर गेले आहेत.

यावेळी शहा यांनी, जम्मू-काश्मीरवासीयांना प्रगती साध्य करून देण्याचे वचन दिले. सरकारने सर्वांसोबत न्याय केला आहे. यामध्ये वाल्मिकी, पहाडी, गुज्जर, बाकेरवाल, पश्चिम पाकिस्तानचे निर्वासित आणि महिला अशा सर्वांचाच समावेश असल्याचे शहा यांनी सांगितले. यावेळी गृहमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरवर आत्तापर्यंत राज्य केलेल्या तीन कुटुंबांनी काश्मीरसाठी काय केले असा सवाल करत काहींनी राज्याचा विकास रोखण्याचा प्रयत्न केला. पणआम्ही कुणालाही राज्याच्या विकासाच्या आड येऊ देणार नाही, असे शहा यांनी सांगितले.