जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

0
31

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये काल झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव अफाक सिकंदर असे असून तो द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता. कुलगाममधील पुंबई आणि गोपालपोरा गावात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार केले. दोन्ही ठिकाणी अजूनही चकमक सुरूच आहे.

यापूर्वी १५ नोव्हेंबरला श्रीनगरच्या हैदरपोरामध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या वर्षात आतापर्यंत १३५ हून अधिक दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे, अशी माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली. दरम्यान, ३८ विदेशींसह १५०-२०० दहशतवादी अजूनही काश्मीर खोर्‍यात सक्रिय असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवादी साथीदारांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून एक आयईडीही जप्त करण्यात आला आहे. पुलवामामध्ये पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी संयुक्त नाकाबंदीदरम्यान दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचे दोन सक्रिय साथीदार पकडले गेले. पुलवामाचा रहिवासी अमीर बशीर दार आणि शोपियानचा रहिवासी मुख्तार अहमद भट अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवादी साथीदारांची नावे आहेत.

बारामुल्ला येथे जवानांवर
दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील पल्हालन पट्टणमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात २ जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान दुसरीकडे, उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कर समर्थित दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला. उरी भागात जवानांनी संशयास्पद हालचाल पाहिल्यानंतर गोळीबार केल्यानंतर घुसखोरांनी पलायन केले.

गुप्तचर यंत्रणांनी खोर्‍यातील दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. तयार करण्यात आलेल्या ३८ दहशतवाद्यांच्या यादीत २७ दहशतवादी लष्करचे असून उर्वरित ११ जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहेत. सुरक्षा दल आता निवडकपणे त्यांचा खात्मा करण्याची योजना आखत आहे.