Home Featured जम्मू काश्मीरमध्ये गेलेले 26 गोमंतकीय सुरक्षित

जम्मू काश्मीरमध्ये गेलेले 26 गोमंतकीय सुरक्षित

0

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

राज्यातून जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले सर्व 26 गोमंतकीय सुरक्षित असून प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.
काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.गृहखात्याला सतर्क करण्यात आले असून राज्यातील पर्यटन स्थळे, प्रमुख बसस्थानके, रेल्वे स्थानके, विमानतळ आदी ठिकाणी कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

काजू महोत्सव लांबणीवर
राज्यात उद्या शुक्रवारपासून होऊ घातलेला काजू महोत्सवाचा कार्यक्रम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उद्या 25 एप्रिल ते 27 एप्रिल या दरम्यान हा महोत्सव होणार होता.

मुख्यमंत्र्याकडून हल्ल्याचा निषेध
काश्मीरमध्ये झालेला हल्ला हा एक अत्यंत भ्याड असा हल्ला आहे, अशा शब्दांत काल मुख्यमंत्र्यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. ह्या हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर केंद्र सरकार कठोर कारवाई करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इको क्लिन रौप्य महोत्सव रद्द
दहशतवादी हल्ला व पोप फ्रान्सिस याच्या निधनामुळे इको क्लिन रौप्य महोत्सवी कार्यक्रम रद्द केल्याचे वनमंत्री राणे यांनी सांगितले.

गोव्यातील 3 दाम्पत्ये वाचली
गोव्यातून पर्यटनासाठी काश्मीरला गेलेल्या पर्यटकांपैकी तीन गोमंतकीय जोडपी केवळ दैव बलवत्तर म्हणून मंगळवारी कश्मीरमधील पेहलगाम-बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांतून वाचल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिली. ही तिन्ही जोडपी या भयावह अशा दहशतवादी हल्ल्याच्या केवळ 15 मिनिटांपूर्वी बैसरन येथून निघाल्याने सुदैवाने या हल्ल्याहून वाचल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुरगावात कडक सुरक्षा

जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे मंगळवारी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात हायअलर्ट घोषित केला आहे. गोव्यातसुद्धा गृहविभागाने पर्यटन स्थळांबरोबर विविध ठिकाणी ‘सागर कवच’ बरोबर मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. मुरगाव तालुक्यातील पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी मंगळवार रात्रीपासून दाबोळी – बोगमाळो समुद्र किनाऱ्याबरोबरच वास्को, बायणा समुद्र किनारी तसेच कुठ्ठाळी, चिखली, एलमॉन्त, हार्बर, मांगूरहील आदी मुख्य नाक्यांवर पोलीस गस्त वाढविली आहे.
गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने येथे गृहविभागाने दिवस – रात्र गस्त वाढविली आहे. अनेक ठिकाणी ‘सागर कवच’ सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. समुद्र किनारीसुद्धा गृहविभागाने हाय अलर्ट घोषित केला आहे. दाबोळी- चिखली राष्ट्रीय मार्गावर पोलीस सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.