जम्मू ः कॉंग्रेसची पत्रकार परिषद रोखून मुख्य प्रवक्त्यास अटक

0
108

जम्मू-काश्मीर कॉंग्रेस पक्षाला काल पत्रकार परिषद घेण्यापासून प्रशासनातर्फे रोखण्यात आले आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते माजी आमदार रविंद्र शर्मा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कॉंग्रेस पक्षातर्फे जम्मू येथील पक्षाच्या मुख्यालयात सदर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पत्रकार परिषद सुरू होण्याआधीच तेथे पोलीस दाखल झाले आणि प्रवक्ते शर्मा यांना वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी बोलणी करण्यासाठी बोलावल्याचे सांगितले. तथापि शर्मा यांनी पोलिसांना सांगितले की, पत्रकार परिषदेसाठी पत्रकार पक्ष कार्यालयात थांबले असल्याने आपण येऊ शकत नाही. परंतु त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने पोलीस वाहनात घालून पोलीस स्थानकावर नेले.

या घटनेनंतर कॉंग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष सुरेश कुमार डोग्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, पोलिसांची ही कृती अलोकशाही प्रकारची आहे. लोकशाही पद्धतीने म्हणणे मांडण्याच्या हक्कापासून वंचित करण्याची ही कृती हुकुमशाहीची असल्याचा आरोप त्यांनी केला. ३७० कलम रद्द केल्याने आम्ही सरकार विरोधात उठाव करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.
…म्हणून शर्मा
यांना घेतले ताब्यात
दरम्यान, पोलिसांच्या एका प्रवक्त्याने सांगितले, की कायदा व्यवस्था राखण्यासाठी खबरदारी म्हणून शर्मा यांना ताब्यात घेण्यात आले आहे.