जम्मूतील हवाई तळावर द्रोन हल्ला

0
35

जम्मूमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर टेक्निकल एरियाजवळ स्फोट झाल्याने २ जवान किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. हवाई दलाच्या या तळावर ५ मिनिटांत २ स्फोट झाले. पहिला स्फोट इमारतीच्या छतावर आणि दुसरा खाली झाला. स्फोटांसाठी दोन द्रोनचा उपयोग करण्यात आला होता. हे हल्ले केलेल्या हल्लेखोरांचा अद्याप तपास लागलेला नाही. पण हवाई दलाच्या तळावर उभी असलेली लढाऊ विमाने हल्ल्यांचे लक्ष्य होती, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना रविवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली.

हे स्फोट ज्या ठिकाणी झाले तिथे जम्मूचे मुख्य विमानतळही आहे. या स्फोटांमुळे हवाई दलाच्या कुठल्याही उपकरणाचे काहीही नुकसान झालेले नाही.

दहशतवादी हल्ला ः पोलीस महासंचालक
जम्मूतील हवाई दलाच्या तळावर रविवारी पहाटे झालेले स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले. द्रोनच्या साहाय्याने हा हल्ला झाला असून हे द्रोन पाकिस्तानातून आल्याचे गुप्तचर संस्थांनी सांगितले. या घटनेनंतर पंजाबमधील पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हल्ल्याचा कट उधळला
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळण्यात आला आहे. या प्रकरणी लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ५ ते ६ किलो अतिसंवेदनशील स्फोटके जप्त केली आहेत. ही स्फोटके तो गर्दीच्या ठिकाणी पेरणार होता असे चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी आणखी काही संशयितांना अटक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली आहे.
दरम्यान, या स्फोटप्रकरणी तपास सुरू असल्याचे भारतीय हवाई दलाने सांगितले.