जमीन बळकावप्रकरणी संशयितांना आयोग नोटीस पाठवणार

0
14

राज्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावप्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्या एक सदस्यीय आयोगाकडून जमीन बळकावप्रकरणी दोन आणि त्यावरील गुन्हे नोंदण्यात आलेल्या संशयितांना नोटीस पाठविली जाणार आहे. या प्रकरणी सुनावणी 20 मार्च 2023 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 27 जणांविरोधात सुनावणी घेतली जाणार आहे. राज्यातील जमीन बळकावप्रकरणात मास्टर माईंड महम्मद सुहैल याच्याविरोधात सर्वाधिक 13 गुन्हे नोंदण्यात आले आहेत. या प्रकरणातील सर्व संशयितांची जामिनावर सुटका झालेली आहे.

राज्यातील जमीन घोटाळाप्रकरणी चौकशी करणाऱ्या आयोगाच्या पाटो पणजी येथील कार्यालयात ही सुनावणी घेतली जाणार आहे. गुन्हे नोंद केलेल्यांना बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.

अनेकांविरोधात गुन्हे
या प्रकरणी तपासणीनंतर अनेकांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. जमीन घोटाळाप्रकरणी प्रथम अटक केलेल्या विक्रांत शेट्टी याच्याविरोधात 2, बार्देशचे तत्कालीन मामलेदार राहुल देसाई याच्याविरोधात 6, पुरातत्त्व खात्याचे धिरेश नाईक याच्याविरोधात 2, राजू कुमार याच्याविरोधात 9, योगेश वझरकर याच्याविरोधात 2, रायसन रॉड्रीगीसविरोधात 9, मारियानो गोन्साल्वीसविरोधात 7, पावलिनो डिनीझ 7, सेंड्रीक फर्नांडिस 4, स्टिवन डिसोझा 7 गुन्हे, नूर भाटकर 2, अमृत गोवेकर 2, संदीप वझरकर 3 गुन्हे नोंद आहेत.