म्हापसा येथील रवळू खलप यांनी पणजी प्रथम श्रेणी न्यायालयात एक याचिका दाखल करून गोवा पोलिसांच्या एसआयटीने मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्याविरोधातील धारगळ जमीन हडप प्रकरणी सुरू केलेल्या चौकशीवर देखरेख ठेवण्याची विनंती काल केली. या याचिकेवर येत्या 15 एप्रिल रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. मांद्रेचे आमदार आरोलकर यांनी धारगळ येथील सुमारे 1 लाख 48 हजार 800 चौरस मीटर जमीन हडप केल्याची तक्रार रवळू खलप यांनी दाखल केली आहे. या प्रकरणी ऑक्टोबर 2020 मध्ये आरोलकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पेडणे पोलीस, आर्थिक गुन्हा विभाग आता एसआयटीकडून सदर जमीन हडप प्रकरणी चौकशी केली जात आहे. राज्य सरकारने नियुक्त एक सदस्यीय आयोगासमोर धारगळ येथील जमीन हडप प्रकरणी चौकशी सुरू आहे. आता, याचिकादाराने प्रथम श्रेणी न्यायालयात याचिका दाखल करून एसआयटीकडून करण्यात येत असलेल्या चौकशीवर देखरेख ठेवण्याची विनंती केली आहे.