राज्यातील जमिनीची सुपिकता तपासण्यासाठीचे ९० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यामुळे संबंधित भागातील शेतकर्यांना कार्डे वितरित केली आहेत. कोणत्या जमिनीत कोणत्या पिकासाठी कोणते खत वापरावे, यासबंधीचे प्रशिक्षण शेतकर्यांना लवकरच देणार असल्याचे आयसीएआरचे संचालक डॉ. एन. पी. सिंग यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
गोव्यातील भात शेतीला टी मॉस्किटो व कॅसू स्ट्रीम या जातीच्या रोगाची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे, असे ते म्हणाले. भारतीय कृषी संशोधन मंडळाच्या ७ क्रमांकाच्या प्रादेशिक विभागाची उद्या दि. ९ व परवा दि. १० असे दोन दिवस बैठक होणार आहे. या बैठकीत गोवा सरकार शेती विषयक समस्यांवर विचार करील व त्यावर उपाय घेण्यासाठी मंडळ ताबडतोब निर्णय घेईल असे डॉ. सिंग यांनी सांगितले. गोवा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व छत्तीसगड या राज्यांतील कृषीमंत्री व अधिकारी मिळून १२० प्रतिनिधी सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.
गोव्यात पशुसंवर्धन विकासाला चालना देण्यास अधिक वाव आहे. हरियाणामध्ये विकसित केलेल्या गायींचा संकर गोव्यात वापरणे उपयुक्त ठरेल. त्यामुळे येथील दुधाच्या उत्पादनात वाढ होऊ शकेल, असे सिंग यांनी सांगितले. या बैठकीत वरील राज्यातील शेतीविषयक समस्यांवर चर्चा होईल, असे ते म्हणाले.