
पूर्वार्धात आदिल खान याने केलेल्या गोलच्या जोरावर एफसी पुणे सिटीने काल रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात जमशेदपूर एफसीचा १-० असा पराभव केला. इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पदार्पण करणार्या जमशेदपूर एफसीने या सामन्यापूर्वी चार सामन्यांत एकाही प्रतिस्पर्ध्याला एकही गोल करू दिला नव्हता. तब्बल चार सामन्यांत त्यांनी यशस्वीपणे बचाव करत प्रभावी कामगिरी केली होती.
भारताचे प्रतिनिधित्व केलेला अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉल याचा बचाव भेदणारा आदिल पहिला खेळाडू ठरला. पुण्याने तिसाव्या मिनिटाला खाते उघडले. मेहताब होसेन याने मार्सेलो परेरा याला बॉक्सबाहेर डावीकडे पाडले. त्यामुळे पुण्याला फ्री-कीक बहाल करण्यात आली. त्यावर मार्सेलोने अप्रतिम फटका मारत निर्माण केलेली संधी आदिलने साधली. आदिलने चेंडू पायाने नेटमध्ये अचूकपणे मारला.
त्यानंतर ४४व्या मिनिटाला जमशेदपूरचा गोल नाट्यमय घडामोडींनंतर ऑफसाईड ठरविण्यात आला. ट्रीडेंट गोन्साल्वीसचा चेेंडू थोपविण्यात आल्यानंतर शौविक घोषकडे चेंडू जाताच त्याने नियंत्रण मिळवित इझु अझुकाच्या दिशेने हवेत फटका मारला. अझुकाने ताकदीने हेडींग केले. चेंडू नेटमध्ये जाताच त्याने जल्लोष सुरु केला, पण काही सेकंदांत ऑफसाईडचा इशारा झाला. उत्तरार्धात जमशेदपूरचे प्रशिक्षक स्टीव कॉप्पेल यांनी बदली खेळाडू उतरवित निकराचे प्रयत्न सुरु केले. सिद्धार्थच्या जागी आशिम बिश्वास, ट्रींडेडच्या जागी र्केवेन्स बेलफोर्ट असे बदल त्यांनी केले.
नऊ मिनिटे बाकी असताना पुण्याच्या लालछुआन्माविया फानाई याला दुसर्या पिवळ्या कार्डसह मैदान सोडावे लागले. पुण्याचा एक खेळाडू कमी झाल्यामुळे जमशेदपूर फायदा उठविणार का याची उत्सुकता होती. त्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले. दोन मिनिटे बाकी असताना फारुख चौधरीने डावीकडून क्रॉस पास दिला. त्यावर मेमोने ताकदवान हेडींग केले, पण पुण्याचा गोलरक्षक कैथने उजव्या हाताने चेंडू थोपविला आणि तो चपळाईने ताब्यात घेतला. पुण्याचा हा पाच सामन्यांतील तिसरा विजय आहे. पुण्याचे नऊ गुण झाले आहेत. पहिल्या चार संघांचे प्रत्येकी नऊ गुण आहेत. जमशेदपूर सहा गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.