चेन्नईला पेनल्टी भोवली

0
72

इंडियन सुपर लीगमध्ये सलग तीन विजय मिळविलेल्या चेन्नईन एफसीची घोडदौडीला लगाम घालण्याचे काम मुंबई सिटी एफसीने केले. त्यांनी घरच्या मैदानावर पेनल्टी किकच्या जोरावर महत्त्वाचा विजय संपादन केला. अचीले एमाना याने सुवर्णसंधीचे गोलमध्ये रुपांतर केले.चेन्नईने यापूर्वी गतविजेता एटीके, एफसी पुणे सिटी आणि नॉर्थईस्ट युनायटेड यांना हरविले होते. मुंबईने मोसमातील दुसरा विजय मिळविला, तर चेन्नईचा हा दुसरा पराभव ठरला. मुंबईने दोन विजय आणि एक बरोबरी अशा कामगिरीसह सात गुण मिळविले. मुंबई पाचव्या स्थानावर आहे. चेन्नईने नऊ गुणांसह तिसरे स्थान राखले. पूर्वार्धातील गोलशून्य बरोबरीची कोंडी उत्तरार्धात सुमारे अर्ध्या तासाने सुटली. ५८व्या मिनिटाला मुंबईचा स्ट्रायकर बलवंत सिंगला चेन्नईचा बचावपटू मैल्सन अल्वेस याने पाडले. पेनल्टी क्षेत्रातच हे घडल्यामुळे पंचांनी त्वरीत पेनल्टी किकचा इशारा करीत अल्वेसला पिवळे कार्ड दाखविले. पेनल्टी घेण्यासाठी कॅमेरूनचा एमाना पुढे सरसावला. त्याने चेन्नईचा गोलरक्षक करणजीत याचा अंदाज चुकवित धूर्तपणे किक मारली. त्याने नेटच्या डाव्या बाजूने चेंडू आत मारला. पिछाडीनंतर चेन्नईने कसून प्रयत्न केले, पण मुंबईने घरच्या मैदानावर बचाव अभेद्य ठेवला. यात गोलरक्षक अमरिंदर सिंग याचा महत्त्वाचा वाटा होता.