
हीरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) पदार्पण करणार्या संघांच्या बहुचर्चित लढतीत जमशेदपूर एफसीने संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीला एकमेव गोलने हरविले. श्री कांतिरवा स्टेडीयमच्या मैदानावर असंख्य संधी दवडलेल्या बेंगळूरूला अखेरच्या मिनिटाला पेनल्टीमुळे फटका बसला. राहुल भेकेच्या चुकीमुळे बेंगळुरूला या पराभवाचा भुर्दंड भोगावा लागला. त्रिनिदाद गोन्साल्वीसने तुरुतुरू धावत बंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत सिंगला चकविले.
भेकेने समीह्ग डौटीला पेनल्टी क्षेत्रात पाडले. त्यामुळे जमशेदपूरला ही पेनल्टी मिळाली होती. जमशेदपूरचा अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉल याने बेंगळुरुची अनेक आक्रमणे फोल ठरवित विजयात उल्लेखनीय योगदान दिले. या पराभवामुळे बंगळुरूची गुणतक्त्यात आघाडी घेण्याची संधी हुकली. सात सामन्यांत त्यांना तिसरा पराभव पत्करावा लागला. तीन चार विजयांसह त्यांचे १२ गुण आहेत. एफसी गोवा तेवढ्याच गुणांसह पण सरस गोलफरकामुळे आघाडीवर आहे. गोव्याचा गोलफरक ८, तर बेंगळुरूचा पाच आहे. जमशेदपूरने सहा सामन्यांत नऊ गुणांसह सहावे स्थान कायम राखले.