गोव्याच्या मुली अंतिम, तर मुलगे उपांत्य फेरीत

0
114

>> एसजीएफआय शालेय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा

गोव्याच्या मुलींच्या संघाने मध्यप्रदेशवर मात करीत मध्यप्रदेश क्रीडा व शिक्षण विभागातर्फे भारतीय शालेय खेळ महासंघाच्या सहकार्याने निमुच-मध्यप्रदेश येथे आयोजित ६३व्या एसजीएफआय शालेय टेनिसबॉल क्रिकेट राष्ट्रीय खेळ अंडर-१९ मुलींच्या विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलांच्या विभागात गोव्याने अंतिम चार संघात स्थान मिळविले आहे.

काल खेळविण्यात आलेल्या उपांत्य सामन्यात गोव्याच्या मुलींनी मध्यप्रदेश मध्यप्रदेशच्या मुलींना नमविले. प्रथम फलंदाजी करताना मध्यप्रदेशने ८ षट्‌कांत ६९ अशी धावसंख्या उभारली. गोव्यातर्फे झरिना कारबारीने ३ तर सिद्धी च्यारी आणि कृपा पटेल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात खेळताना गोव्याने विजयी लक्ष्य ७.५ षट्‌कांत गाठले. दीपलक्ष्मी नाईकने ४५, कृपा पटेलने ९, प्रीया नाईकने ५ तर कौशिका नाईकने ४ धावांचे योगदान दिले. आज सायं. ६ वा. विद्युतझोतात होणार्‍या अंतिम सामन्यात गोव्याची गाठ उत्तर प्रदेशच्या मुलींशी पडणार आहे.
दरम्यान, मुलांच्या विभागात गोव्याच्या मुलांच्या संघाने उत्तर प्रदेशचा पराभव करीत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. प्रथम फलंदाजी करताना गोव्याने १० षट्‌कांत १०५ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात खेळताना उत्तर प्रदेशचा संघ ४५ धावांवर गारद झाला. आज होणार्‍या उपांत्य फेरीत गोव्याची गाठ मध्यप्रदेशजची तर जम्मू काश्मीरचा सामना सीबीएसई संघाविरुद्ध स. ९ वा. होईल.