जनतेला लाचार बनवित असल्याचे आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळले 

0
98

आपल्या सरकारने आर्थिक मदतीच्या योजना राबवून कुणालाही लाचार बनविलेले नसून जनतेचा स्वाभिमान जागृत केल्याचे स्पष्ट करीत सरकार जनतेला लाचार बनवित असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल अर्थसंकल्पीय चर्चेस उत्तर देताना खंडन केले.

आपण सर्व जनतेचे सेवक आहोत. त्यामुळे सभागृहात नम्रपणे व शालीनपणे वावरले पाहिजे हे आपण विरोधी नेत्यांकडून शिकून घेतल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. आपल्या सरकारचे भवितव्य आपल्या व नरेश सावळ यांच्या हातात नसून ते जनता जनर्दनाच्या हातात असल्याचे ते म्हणाले. कर्ज काढून योजना राबविल्या हा विरोधकांचा आरोप तथ्यहीन असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आपल्या सरकारची दीनदयाळ योजना ही देशातील अपूर्व अशी योजना असून या योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचे आरोग्यमंत्र्यांनी ठरविले आहे, अशी माहितीही पार्सेकर यांनी काल दिली.
दक्षिण गोव्यातील इस्पितळाची कोनशिला २००८ मध्ये बसविली होती. हा प्रकल्प लांबणीवर पडल्याचे खापर आपल्यावरच नको. २०१२ पर्यंत दिगंबर कामतही मुख्यमंत्री होते. या वर्षाच्या अखेरपर्यंत इस्पितळ सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. आरोग्याच्या बाबतीत आपल्या सरकारने काळजी घेतली आहे. ७ इस्पितळे पूर्णत्वास पोचली आहेत तर ७ इस्पितळे नव्याने बांधण्याचे ठरविले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखालील रक्कम लाभार्थिंना मिळण्यास विलंब झाला हे खरे आहे. त्याला सरकार जबाबदार नाही. बँकांनी १५ नंबरचा खातेक्रमांक करण्याचे ठरविले. यासंबंधीच्या तांत्रिक कारणामुळेच लाभार्थिंना पैसे मिळण्यास अडचण झाली. परंतु आता ङ्गक्त ४ हजार लाभार्थीच उरले असून इतर सर्व लाभार्थिंना निधी वितरित झाल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.
वर्षभरात मांडवी पुलाचे काम
मांडवीवरील नव्या मांडवी पुलाचे काम पुढील दहा-बारा महिन्यांत पूर्ण होईल. त्यानंतर वाहन चालकांची गैरसोय दूर होईल, असे पार्सेकर यांनी सांगितले. सध्या काम चालू असल्याने गैरसोय होणे स्वभाविकच आहे, असे पार्सेकर म्हणाले. विकासाच्या बाबतीत आपले सरकार गंभीर असल्याचे ते म्हणाले. कृषी क्षेत्रात आता पात्रतापूर्व मनुष्यबळ असल्याचे पहायला मिळते, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
५० हजार नोकर्‍यांच्या संधी
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने आतापर्यंत ११४ प्रकल्पांना मान्यता दिली असून या प्रकल्पांवर सरकारचे लक्ष आहे. त्यामुळे कोणताही प्रकल्प विकता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. वरील ११४ प्रकल्पांमध्ये ९४ प्रकल्प गोवेकरांचे आहेत, अशी माहिती पार्सेकर यांनी दिली. ९२० कोटी गुंतवणुकीचे हे प्रकल्प असून त्यातून २० हजार ७४० नोकर्‍यांच्या संधी निर्माण झाल्या आहेत. पाच वर्षांच्या काळात म्हणजे पुढील ३ वर्षांत ५० हजार नोकर्‍यांच्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.
कॅसिनोंवर नियंत्रणाचा दावा
आपल्या सरकारने कॅसिनोला विरोध केल्यामुळेच राज्यात कॅसिनोच्या संख्येवर नियंत्रण आल्याचे सांगून मांडवीतील कॅसिनो हलविण्याची गरज त्यांनी प्रतिपादली. सरकारने नवीन कॅसिनोसाठी येणारे अर्जही स्वीकारले जात नाहीत, असे पार्सेकर यांनी सांगितले. जमिनीवरील कॅसिनोंची संख्या १४ वरून ९ झाल्याचे ते म्हणाले. येत्या ३० रोजी ङ्गर्मागुडी येथे आयआयटी अभ्यासक्रमाच्या प्रकल्पाचे उद्घाटन करणार असल्याची माहिती देऊन राज्यातील शैक्षणिक क्रांतीचे पर्व सुरू झाले असल्याचे आपण मानत असल्याचे त्यांनी सांगितले.