सांत आंद्रे मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजप उमेदवार विष्णू वाघ यांनी काल पत्रकारांना एका ‘जगावेगळ्या’ पुलाची कहाणी सांगितली. संपूर्ण जगात कुठे नसेल असा एक पूल सांत आंद्रे मतदारसंघातील डोंगरी या गावी असल्याचे ते म्हणाले.
डोंगरी-आगशी-कुंडई असा एक बगलमार्ग होऊ घातलेला आहे. मात्र, तो होण्यास आणखी किमान २० वर्षे वाट पहावी लागेल, असे दिसते असे सांगून या प्रस्तावित बगलमार्गासाठी सांत आंद्रे मतदारसंघाचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी आताच गरज नसताना पूल बांधून ठेवला असल्याचे वाघ म्हणाले. कित्येक ठिकाणी नदीवर तातडीने पूल उभारण्याची गरज असताना तेथे पूल न उभारता हा पूल उभारणारे कॉंग्रेस सरकार ग्रेटच असल्याचे ते म्हणाले.
नेवरा येथील तीन डोंगरांनालागलेली आग भू माफियांकडून
विष्णू वाघ यांचा आरोप
परवा सोमवार दि. २० रोजी सांत आंद्रे मतदारसंघातील नेवरा या गावातील तीन डोंगरांना एकाच वेळी अज्ञातांनी आग लावण्याची घटना घडल्याचे सदर मतदारसंघातून भापच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणारे उमेदवार विष्णू वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दिल्ली, मुंबई व बेंगलोर येथील बिल्डरांचा आग लावण्यात आलेल्या या डोंगरांवर डोळा असून स्थानिक राजकारण्यांच्या आशीर्वादाने ते सदर डोंगर काबीज करू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बिल्डरांना जमीन रुपांतर करून देण्यासाठी २४ लाख रु.ची लांच घेतल्याचा ज्या मंत्र्यावर आरोप आहे तोही या कटकारस्थानात असल्याचा आरोप वाघ यांनी केला. नेवरा, शिरदोन आदी ठिकाणच्या शेत जमिनींचे बिगरशेतजमिनीत रुपांतर करण्यासाठी सदर मंत्र्याने हे करोडो रु. घेतले असल्याचा आरोप वाघ यांनी केला.
नेवरा, सुलाभाट, देवभार अशा तीन ठिकाणच्या डोंगरांना एकाच वेळी आग लागते या घटनेकडे दुर्घटना म्हणून पाहता येणार नाही. राज्याबाहेरील बिल्डर व स्थानिक राजकारण्यानी मिळून हे अग्निकांड केल्याचा आरोप त्यांनी केला. सदर डोंगरांवर काजू, आंबा, फणस, सागवान, माट्टी तसेच जांभळाची व अन्य कित्येक जातीची शेकडो झाडे होती. ती सगळी आगीत जळून खाक झाली असल्याचे वाघ म्हणाले, ज्या शेतकर्यांच्या मालकीची ही जागा आहे त्यांच्यावर दडपण आणून ती मिळवण्याचा कुटील डाव राजकारणी व बिल्डरानी आखला असल्याचा आरोप वाघ यांनी केला. त्यासाठीच त्यांच्या बागायतींना आग लावण्यात आल्याचा संशय वाघ यांनी व्यक्त केला आहे.
आग लावण्यात आलेला नेवरा येथील जो मोठा डोंगर आहे तो पुष्पावती मडकईकर व राजेश कवळेकर यांच्या कुटुंबीयांचा असून दुर्गादास नाईक, प्रताप नाईक, मीरा नाईक, सुरेश नाईक व रमाकांत नाईक हे या जमिनीचे कूळ असल्याचे वाघ यांनी सांगितले. वरील तिन्ही डोंगरांवरील आग गावापर्यंत भडकून निवासी घरांनाही धोका निर्माण झाला होता, असेही वाघ यावेळी म्हणाले.
आगीमुळे शेतकर्यांच्या बागायती पूर्णपणे नष्ट झालेल्या असल्याने सरकारने या शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही यावेळी विष्णू वाघ यांनी केली.
आमदार बंधूंकडून मारहाणीचा प्रयत्न
सोमवारी आपण धाकटे नेवरा येथे कोपरा बैठक घेत असताना स्थानिक आमदाराच्या बंधूने गुंडांसह आपणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे वाघ यांनी पत्रकारांना सांगितले. या प्रकरणी आपण आगशी पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर कमल बेतकीकर नामक एका आरोपीला अटक करण्यात आली. मात्र, आमदाराच्या भावाला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे ते म्हणाले. आंतोनियो सिल्वा असे त्याचे नाव असून आमदाराच्या कार्यालयाच्या उद्घटनाला तो हजर होता असे सांगून तो फरारी असल्याचे सांगणार्या पोलिसांना तो त्यावेळी कसा सापडला नाही, असा प्रश्नाही वाघ यांनी केला.