जगाच्या कल्याणा ‘मानवतेचे पुजारी’

0
32
  • रमेश सावईकर

19 ऑगस्ट हा ‘जागतिक मानवता दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मानवतेच्या कर्तव्यमूल्यांची जाणीव समाजाला होते. जगभर शांती नांदावी, लोक सुखी, समाधानी, आनंदी राहावेत, अशी भावना प्रत्येकाच्या हृदयी, मनी निर्माण होऊन ती अभिवृद्धीत व्हावीत, हाच या दिनाचा संदेश!

मानवसेवा हे आपले मूलभूत कर्तव्य आहे. परंतु हे मूल्य जीवनात जपणारी माणसे दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत, हे आपले दुर्दैव! माणूस स्वकेंद्रित झाल्याने दुसऱ्याचा विचार करण्याची त्याची मानसिकता कमी होत चालली आहे. एवढेच नव्हे तर केवळ एक वृत्ती म्हणून मानवतेची मूल्ये जोपासण्याचा धर्म त्याने सोडूनच दिला आहे. दुसऱ्याचा चांगला विचार करणे, त्याचे भले व्हावे, तो सुखी राहावा म्हणून कार्य करण्याऐवजी स्वतःच्या स्वार्थासाठी, अहंकारापायी माणूस माणसाचाच शत्रू बनत चालला आहे. म्हणूनच जगामध्ये आज दहशतवाद, हिंसाचार, गुन्हेगारी फोफावते आहे. त्याची पाळेमुळे उपटून काढण्यासाठी प्रयत्न केला तरच या दुष्टचक्रातून माणसाची सुटका होऊ शकते. पण दुर्दैव हे की त्याला खतपाणी घालण्यासाठी माणूस कार्यरत आहे. हे कुठेतरी थांबायला हवे. याकरिताच मानवता, सत्य, शांती धोक्यात येता कामा नये यासाठी झटणारी माणसे एकत्र येऊन मानवतावादी कार्य करीत आहेत.

मानवसेवा हे आपले मूलभूत कर्तव्य आहे, याची जाणीव ठेवून वावरणारी माणसे एक व्रत म्हणून, हे मूल्य खऱ्या अर्थाने अंगीकारून स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी झटत आहेत. गरजू व असाहाय्य लोकांच्या सेवेसाठी मनोभावे अखंड व अविरतपणे तत्पर राहून कार्य करणाऱ्या या माणसांचा सन्मान होणे उचितच आहे. अशा मानवतावादी लोकांच्या सन्मानार्थ 19 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी ‘जागतिक मानवता दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो.
‘गरजूंना योग्यवेळी योग्य ते साहाय्य मिळाले पाहिजे’ हा संदेश घेऊन ज्यांनी जागतिक स्तरावर मानवतावादी कारणास्तव आपले प्राण पणाला लावले, त्यांचे स्मरण मानवता दिनी केले जाते. मानवतेची सेवा करणारे व त्या सेवांचा लाभ घेणारे या दोन्होंचा यामध्ये समावेश केला जातो. प्रत्येकाला मानवतावादी मूल्यांची आठवण करून देण्याचा उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे. जगभर मानवतावादी कार्य करत असताना ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस साजरा होतो.

19 ऑगस्ट 2003 रोजी इराकची राजधानी बगदाद येथील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयावर हल्ला झाला. त्या घटनेत संयुक्त राष्ट्राचे 22 सहयोगी ठार झाले. तेव्हापासून हा दिवस ‘जागतिक मानवता दिन’ म्हणून साजरा केला जातो. बगदाद दुर्घटनेनंतर चार हजारांहून अधिक मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आले होते. यात अनेकांचा मृत्यू झाला, अनेकजण जखमी झाले, तर अनेकांना अटकही झाली. ज्यांच्यावर संकटे आली, त्यांचा जीव वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालूनही ज्यांनी मानवतेसाठी कार्य केले त्यांचा सन्मान करण्याचा, गौरव करण्याचा हा दिवस.

संयुक्त राष्ट्र महासभेने 19 ऑगस्ट 2009 मध्ये ‘जागतिक मानवता दिना’ची घोषणा केली. सर्जियो व्हिएरा डिमेलो यांनी 2003 मध्ये मानवतावादी कार्याचा पाया घातला. त्याचा परिणाम जिन्हेवा, फ्रान्स, स्वित्झर्लंड, जपान, ब्राझिल येथील लोकांवर होऊन त्या प्रदेशांत मानवतावादी संघटना स्थापन झाल्या. जगात मानवी जीवनाला प्रतिकूल अशा अनेक बाबी आहेत. त्यांविषयी जनजागृती व सेवाकार्य करण्याची गरज ओळखून या संघटना कार्य करीत आहेत. जगात दिवसेंदिवस हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. त्या रोखण्यासाठी, किंबहुना त्यांत घट होण्याकरिता सामाजिक जागृतीची गरज आहे. ही गरज ओळखून काम करणाऱ्या मानवतावादी कार्यकर्त्यांचे कार्य खूप महत्त्वाचे आहे. जगभरात आज लाखो लोकांना अन्न, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांना मदतीची गरज आहे. प्रगत देशांनी पुढाकार घेऊन मानवतावादी दृष्टिकोनातून हे प्रश्न सोडवले तर बऱ्याच अंशी लोक सुखी-समाधानी होऊ शकतील.
जगात कर्करोगी, एड्सग्रस्त, याशिवाय कुपोषण, रोगराई, नैसर्गिक आपत्ती (पूर, भूकंप वगैरे) यांत संकटग्रस्त झालेल्या लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची लोकांनी दखल घेतली पाहिजे. अशा लोकांना मदत देण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या विचारांना चालना देणे आवश्यक आहे. त्यासाठीच या दिनाचे महत्त्व आणखी वाढले आहे.

मानवतावादी संस्था जगभरात एक मिशन (ध्येयवाद) म्हणून दया, सहानुभूती, निष्पक्षता, तटस्थता, स्वातंत्र्यासह अशा अनेक तत्त्वांवर कार्यरत आहेत. त्यांच्याठायी राष्ट्रीयता, धर्म, जात, लिंग, वंश असा भेदभाव नाही. संकटग्रस्तांचे आयुष्य वाचविण्यासाठी, दीर्घकालीन पुनर्वसनासाठी मदत करण्याचा प्रयत्न, हाच या संस्थांचा प्रमुख उद्देश असतो. म्हणूनच मानवतावादी कार्यकर्त्यांचा आदर केलाच पाहिजे. मानवतावादी संस्थांची मूलभूत कार्यसंकल्पना ‘वसुधैव्‌‍ कुटुंबकम्‌‍’ अशी आहे. ‘विश्वची माझे घर’ ही संकल्पना आचरणात आणून जगामध्ये समता प्रस्थापित व्हावी, शांती व सलोखा निर्माण व्हावा या उद्देशाने वावरणाऱ्या जगभरातील सर्व मानवतावादी संस्थांचे ‘मानवता हे आपले मूलभूत कर्तव्यमूल्य आहे’ हेच ब्रीद आहे.

महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा व शांती ही मूल्ये जगभरात प्रचारात आणली. येशू ख्रिस्तानेही शांतीचा संदेश जगाला दिला. संत ज्ञानेश्वरांनी तर विश्वाचे भले व्हावे म्हणून परमेश्वराकडे पसायदान मागितले. ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो,
जो जे वांच्छील तो ते लाहो प्राणीजात’ असे त्यांनी पसायदानात म्हटले आहे.
जगात आज सर्व स्तरांवर विविध क्षेत्रांत आपत्ती उद्भवत आहेत. नैसर्गिक आपत्ती येतात त्या माणूस रोखू शकत नाही; परंतु हवा, अन्न, पाणी, निवारा, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत गरजा पुरविण्याच्या कामी राष्ट्रा-राष्ट्रांतील सत्ताधारी सरकारे अपयशी ठरत आहेत. त्यामुळे मानवनिर्मित आपत्तींना लाखो लोकांना सामोरे जावे लागत आहे.

माणसाचा स्वभाव स्वार्थ आणि लोभकेंद्रित बनला आहे. त्याला अधिकार हवेत, पण कर्तव्याची जाणीव ठेवून ती पार पाडली पाहिजेत अशी त्याची विचारधारणा नाही. प्रत्येक क्षेत्रात जी स्पर्धा चालली आहे त्याच्या मुळाशी स्वार्थ आहे. स्पर्धकांविषयी आसुडाची भावना आहे. भ्रष्टाचार तर पाचवीला पुजलेला आहे. या बदलत्या एकूण परिस्थितीचा समाजावर परिणाम तर झालेला आहेच, पण समाजाचा मूळ घटक असलेले माणसाचे ‘कुटुंब’ यावरही त्याचा परिणाम दिसून येतो आहे.

कुटुंबातील सदस्यांमध्ये केवळ निवाऱ्यापुरताच एकोपा आढळतो. वैचारिक मतभेद, परस्परांमध्ये सुसंवाद यांचा अभाव जाणवतो. प्रत्येकजण आपल्याच विश्वात वावरत आहे. त्यामुळे माया, प्रेम, आपुलकी, आदर आदी मूलभूत भावनिक नात्याचे अनुबंध विस्कळीत होत चालले आहेत. कुटुंबप्रमुख हा नाममात्र राहतो. त्याचा जाणतेपणा, त्याचा जीवनविषयक अनुभव व त्यावर आधारित विचार-निर्णय घेण्याची असलेली क्षमता इतरांच्या दृष्टीने गणनेतच नाही. त्यामुळे कुुटुंबे ‘शिडाविना नौके’सारखी बनली आहेत. अशा स्वरूपाची कुटुंबे एकत्र येऊन समाज घडतो. त्या समाजामध्ये तर विविध धर्म, जाती, पंथ आहेत. त्यामुळे एकात्मतेची भावना कोठून निर्माण होणार? आजचे माणसाचे जीवन हे स्वतंत्र आहे; पण ते सर्व मर्यादांपलीकडे जाऊन ‘स्वैर’ बनले आहे. स्वैरतेच्या मार्गाने माणूस पुढे जात राहिला तर तो भरकटतच जाणार. समाजातील हा प्रतिकूल प्रवाह मानवी जीवनाला घातकच आहे.

माणसांची गर्दी एवढी वाढली आहे की या गर्दीत माणूस माणसाला हरवून बसला आहे. गडबड-घाईने ग्रस्त असलेल्या जीवनात त्याला फुरसतीचे क्षण सापडणे कठीण बनत चालले आहे. ताणतणावाचे जीवन जगताना आनंद, सुख नि समाधानाला तो मुकला आहे. या एकूण परिस्थितीची जाणीव त्याला करून देणारा विचारप्रवाह वर्धित झाला पाहिजे. त्याकरिता ‘विविधतेत एकता’ हे तत्त्व पाळले पाहिजे. मानवता धर्माचे पालन केले पाहिजे. साने गुरुजी म्हणतात- ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे!’ जे हीन आहेत, जे पतीत आहेत त्यांना जागृत केले पाहिजे. त्यांना मदतीचा हात पुढे केला पाहिजे. त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

19 ऑगस्ट हा ‘जागतिक मानवता दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मानवतेच्या कर्तव्यमूल्यांची जाणीव समाजाला होते. जगभर शांती नांदावी, लोक सुखी, आनंदी, समाधानी व्हावेत, अशी भावना प्रत्येकाच्या हृदयी- मनी निर्माण होऊन ती अभिवृद्धीत व्हावी, हाच या दिनाचा संदेश!