जगणं मात्र घुस्मटतंय!

0
214
  •  राधा भावे

स्त्रीविषयीचा आदरभाव हा केवळ लेखनात अन् भाषणात व्यक्त करायचा, आणि तो व्यक्त करणार्‍यांनीच चार भिंतीच्या आत स्त्रीला हिणकस वागणूक द्यायची हा दांभिकपणा आपल्या समाजात वर्षानुवर्षे चालू आहे.

 

कॉलेजमध्ये माझ्याबरोबर शिकणारी ती मार्केटमध्ये अचानक भेटली. बोलता बोलता तिने ती नोकरी करत नसल्याची खंत व्यक्त केली. ‘अगं, मला तर मी नोकरी करतेय याचीच खंत वाटते कधीकधी’- हे शब्द अगदी ओठाशी आले होते माझ्या; परंतु मी ते बोलणं टाळलं. तिला ते आवडलं नसतं अन् खरंही वाटलं नसतं.

मग मला मानवी स्वभावाच्या विचित्रपणाचं हसू आलं. तिला नोकरी नाही (परंतु आर्थिक स्थिती उत्तम आहे), त्यामुळे धावपळ-दगदग थोडी कमी. हाताशी भरपूर वेळ. एखादा छंद जोपासणे, आपले घर, परिवार, नातेवाईक यांना पुरेसा वेळ देणे शक्य आहे; परंतु नोकरी नसल्यामुळे हे सारं तिला निरर्थक वाटतंय… आपण काहीच करत नाही आहोत, अगदी ‘बेकार’ आहोत असं वाटतंय. अन् मला चांगलं पद, पगार, स्वतःला सिद्ध करण्याची संधी (म्हणजे नक्की काय बरं?) वगैरे बरंच काही आहे. मला माझं कामही आवडतं… परंतु मलाही कधीकधी एक खंत कुरतडतेच- ‘या नोकरी नावाच्या कसरतीत आपण माणूस म्हणून किती शिल्लक राहतो?’
आपल्या वडीलधार्‍यांच्या बाबतीत आपली काही कर्तव्यं असतात. तसं तर आपण कुणाचीच, कशाचीच तशी परतफेड नाही करू शकत… परंतु माणूसपणाची परंपरा जपण्याचा दुवा नक्की बनू शकतो. परंतु कधीकधी असे प्रसंग उद्भवतात की आपलं असणं निरर्थक असल्याचा भाव मनाला छेडू लागतो.

आपण आपल्या ऑफिसच्या कामासाठी प्रवासाला निघालेलो असताना ‘आई खूप आजारी आहे’- हा निरोप ना आपल्याला निश्‍चिंततेने पुढं जाऊ देत, ना बेधडकपणे मागे फिरू देत. ‘ड्युटी फस्ट’चा मंत्र मनातल्या मनात कितीही मोठ्याने म्हणत राहिलो तरी आपल्या सर्व जाणिवा व्यापण्याचं सामर्थ्य त्याच्यात नसतं. त्यामुळे सतत एक टोचणी, रुखरुख, भेसूर धास्ती मनाच्या कानाकोपर्‍यातून फिरत राहते. आपण आपल्या वैयक्तिक आणि भावनिक जबाबदार्‍या टाळणं म्हणजे नोकरीसंदर्भात कर्तव्यदक्ष का? आणि अशी ही कर्तव्यदक्षता आपण कुणासमोर ठेवू पाहतो? यातून काय सिद्ध करू पाहतो? -याचा अर्थ आपण आपल्या लौकिक प्रतिमेबाबत विलक्षण जागरूक असतो… असा आणि एवढाच अर्थ आहे का? नाही. तसंही नव्हे. कधीकधी आपल्या नोकरीसंदर्भात एखादं विशिष्ट काम, विशिष्ट वेळी आपण आणि आपणच करू शकतो. दुसर्‍या कुणाला ते जमणारं नसतं आणि ते पार पाडणं आपली जबाबदारी असते. अर्थात हा चुकीचा किंवा गोड गैरसमजही असू शकतो. परंतु तो आपल्या मनावर एवढा स्वार झालेला असतो की कितीही निश्‍चय करून त्याच्यातून सुटायचं म्हटलं तरी आपण सुटू शकत नाही. हे समज आपल्याला खोल, अजून खोल रुतवत नेतात. कुणाच्या नसण्यामुळे, जाण्यामुळे कुणाचं काही अडत नाही. ही वस्तुस्थिती सगळेच जाणतात. परंतु त्या वस्तुस्थितीशी जुळवून घेणं आपल्यापैकी बरेचजण टाळतात. आपल्या कार्यालयात आपण नसलो तर काय घडतं अन् काय काय घडू शकतं याचा अंदाज आहे म्हणून असेल, एखाद दिवशी रजा टाकून घरी राहिले तर दिवसभर मनात ऑफिस घेऊनच वावरत राहण्याचा वेडेपणा मी करते. संध्याकाळी ते सुटण्याची वेळ झाली की निश्‍चिंत बनते. हे हास्यास्पद आहे, परंतु ते आहे. ही आपली कामाविषयीची आपुलकी, बांधिलकी, प्रामाणिकपणा का जबाबदारीच्या जाणिवेपोटी कायम मनात ठाण मांडून बसलेली काहीतरी ‘अभद्र तर घडणार नाही ना?’ ही धास्ती? -खरोखर संशोधनाचाच विषय आहे.

आपली शक्ती अन् आपल्या गाठी असलेला वेळ याचा अचूक अंदाज नसतो म्हणून म्हणा किंवा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा मोह पडत जातो म्हणून म्हणा, आपण नवनवीन व्यापांत गुरफटत जातो अन् दिवसभर प्रवाहपतिताचं जिणं जगत राहतो.
– जिथून सुटावंसं वाटतं तिथंच अडकलं जाणं आणि जिथं गुंतावं वाटतं तिथून तुटून जाणं हा एक विचित्र खेळ खेळत असते नियती, एवढं खरं!

नोकरीनिमित्त घराबाहेर पडणार्‍या स्त्रियांविषयी नोकरी न करणार्‍या स्त्रियांच्या मनात अनेक काल्पनिक नि सुंदर समज असतात. त्यातला सर्वात मोठा- ‘नोकरदार स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असते आणि म्हणून स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्याची चैन ती करू शकते,’ हे किती खरं ते ती स्त्री आणि परमेश्‍वरच जाणे. दिवसभर ऑफिसचं काम करून (अर्थात ती कामचुकार नसेल तर!) संध्याकाळी थकूनभागून घरी येते तेव्हा घरच्या मंडळीकडून अनेक अपेक्षांचे अन् प्रश्‍नांचे काटेरी कुंपण भराभर तिच्याभोवती रचले जाते, ही काही घरांमधली तरी कठोर वस्तुस्थिती आहे. अनेक घरांमध्ये सराईत लुुटारूंसारखे तिच्या पगारावर डल्ला मारणारे लोक आढळतात. तिच्यासाठी घरात खोळंबलेली कामं तिला श्‍वास घ्यायलाही फुरसत देत नाहीत. तिच्या एकूणच धडपडीविषयी, कष्टांविषयी गौरवोद्गार, कौतुक, शाबासकी, सहानुभूती क्वचितच तिच्या वाट्याला येते. प्रेम- मिळतं का? तिचं तिलाच माहिती. कारण प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी असते- ते देणार्‍याची अन् घेणार्‍याचीही. पण एक नक्की, ‘आदर’ मात्र खूपच दुर्मीळ!!
स्त्रीविषयीचा आदरभाव हा केवळ लेखनात अन् भाषणात व्यक्त करायचा, आणि तो व्यक्त करणार्‍यांनीच चार भिंतीच्या आत स्त्रीला हिणकस वागणूक द्यायची हा दांभिकपणा आपल्या समाजात वर्षानुवर्षे चालू आहे.

तसं तर आपण विशेषतः स्त्रिया स्वातंत्र्याच्या खर्‍या अर्थापर्यंत पोचतच नाही. स्वतःला जाणणं, स्वतःला शोधणं, स्वतःचं जीवन सुव्यवस्थित बनवणं, एक व्यक्ती म्हणून विकसित होणं, यासाठी कितीजणीना पुरेसा वेळ, पुरेसा अवकाश मिळतो? एखाद्या गोष्टीबाबत आपलं मत, आपली निवड, आपला निर्णय सहजतेने अन् आत्मविश्‍वासाने कितीजणी घेऊ शकतात? आणि त्याहीपेक्षा स्वतःला न रूचणार्‍या, न पटणार्‍या, अयोग्य वाटणार्‍या गोष्टीना नाही म्हणण्याचं बळ कितीजणींमध्ये असतं?
कधीकधी गोठ्यातल्या गाईच्या गळ्यातलं दावं काढून, एक लांबलचक दोरखंड बांधून तिला मोकळ्या जागेत एखाद्या झाडाला बांधून टाकतात. तिला चरायला विस्तीर्ण जागा मिळते, राखत बसायची गरज नसते… आणि ती सुटूनही जाऊ शकत नाही.
तसंच… आधुनिक जगातील, विशेषतः नोकरी करणार्‍या अनेक स्त्रियांच्या फक्त पिंजर्‍याचा परिघ वाढलाय… आणि या परिघाचं आकर्षणही वाढलंय…
जगणं मात्र घुस्मटतंय!!