छत्तीसगडमध्ये 29 नक्षलवाद्यांचा खात्मा

0
3

एक कमांडरही ठार, पोलीस, बीएसएफ, सीआरपीएफची कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या आधी छत्तीसगडच्या कांकेरमध्ये पोलीस, बीएसएफ व सीआरपीएफचे जवान आणि नक्षली यांच्यात काल चकमक झाली. या चकमकीत प्रमुख कमांडर शंकर राव याच्यासह एकूण 29 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच एके-47 रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीत बीएसएफचे निरीक्षक रमेश चौधरी यांच्यासह तीन जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती देखील समोर आली आहे.

बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांकेर येथे नक्षलवाद्यांच्या विरोधात काल जवानांनी मोहीम सुरू केली होती. नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत 29 जणांचा खात्मा केला आहे. त्यात शेखर, ललिता आणि राजू या दीर्घकाळापासून नक्षलवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या नक्षल्यांचाही खात्मा करण्यात आला. 29 नक्षलवाद्यांना ठार केल्यानंतर एके 47, एसएलआर, 303 अशा बंदुका आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला. चकमक अद्यापही सुरू आहे. आमचे तीन जवान जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती सुंदरराज यांनी दिली.

सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत नक्षलवाद्यांचा कमांडर शंकरही मारला गेला आहे. त्याच्यावर 25 लाखांचे बक्षीस होते. या ठिकाणाहून पोलिसांनी 25 एके-47 रायफल्स, दोन एलएमजी आणि काही 303 बंदुका तसंच मोठ्या प्रमाणावर दारुगोळाही जप्त केला आहे.

मतदानापूर्वी मोठी कारवाई
लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी ही चकमक झाली आहे. कांकेर लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्जही भरण्यात आले आहेत. कांकेरमध्ये 26 एप्रिलला मतदान होणार आहे. बस्तर लोकसभेसाठी चार दिवसांनी म्हणजेच 19 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी मतदान पथकेही रवाना झाली आहेत.