छठ पूजा ः मुलींची कामना करणारे व्रत!

0
137
  • मृदुला सिन्हा (गोव्याच्या राज्यपाल)

समाजाचे समूहमन मुलींचा नेहमीच गौरव करीत आलेले आहे. या सण – उत्सवांतील गाणीच ते दृगोच्चर करतात.
आपण शहरीकरण आणि आधुनिकीकरणाच्या रेट्यात या रीतीभाती, सण – उत्सवांचा गाभाच विसरत चाललो आहोत…

आपली शास्त्रे, पुराणे आणि लोकसाहित्याचे दाखले देत लोक लिहिताना, बोलताना, सांगताना आढळतात की, भारतीय समाज स्त्रीविरोधी आहे. तिला जन्मतःच मीठ चाटवून मारण्याचा प्रयत्न होतो, तिचे पालनपोषण व्यवस्थित होत नाही. घरात किंवा समाजात तिला दुय्यम स्थान दिले जाते, अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात. परदेशातही भारतीय समाज स्त्रीविरोधी असल्याचे चित्र रंगवले गेले आहे.
खरे तर आपण जसा चष्मा लावतो, तसे जग आपल्याला दिसते. तीनेक दशके आपल्या समाजाला एक रोग लागलेला आहे, तो म्हणजे स्त्रीभ्रूणहत्येचा. गर्भजल चाचणीच्या एका यंत्राद्वारे गर्भलिंग चाचणी करून गर्भ मुलीचा असल्यास जन्मापूर्वीच भ्रूणाची हत्या करण्याचे प्रकार सुशिक्षित शहरांमध्येही बोकाळले आहेत आणि हळूहळू हे लोण आता गावोगावी झिरपत चालले आहे.

अशा स्त्रीभ्रूणहत्यांमुळे समाजातील स्त्री – पुरुषांच्या प्रमाणाचे संतुलन बिघडलेले आहे. सरकार, समाज आणि धार्मिक संस्था स्त्री भ्रूण हत्या थांबवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही वर्तमानातील स्थिती असली, तरी त्याबाबत भारतीय समाजाचे चित्र रेखाटले जाऊ नये. तो काही आपला इतिहास नव्हे. भारतीय मन किंवा समाजाचे वैशिष्ट्य जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला येथील लोकसाहित्यात डोकवावे लागेल. आपला सामाजिक इतिहास चाचपून पाहण्यासाठी शास्त्र – पुराणांचा अभ्यास हवाच, परंतु आपल्या लोकपरंपरा, रीतीभाती, सण – उत्सव, सोळा संस्कार आदींवेळी गायल्या जाणार्‍या लोकगीतांमधून आपली सामाजिक दृष्टी आणि समाज व्यवहार अधिक स्वच्छपणे प्रतिबिंबित होतात. समाजावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. लोकमानस घडवण्यात लोकगीते आणि संस्कारांचा मोठा वाटा आहे.

बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात साजरे होणारे ‘छठपूजे’चे व्रत देशभर आणि जगभरातही, जिथे बिहारी लोक स्थायिक आहेत, तेथे उत्साहाने साजरे होते. तीन दिवस चालणार्‍या या कष्टप्रद, परंतु आनंददायी व्रताचरणाची काही वैशिष्ट्ये आहेत. उदा. मावळत्या सूर्याला अर्घ्य देणे. उगवत्या सूर्याला सगळेच नमस्कार करतात, पण मावळत्या सूर्याला नमस्कार करणे हे वेगळेपण आहे. यामागे गहन अर्थ आहे. जो गेला आहे, तो परत येईल, असा त्यात आशावाद दिसतो. नाही तरी आपण आशेवरच जगत असतो.
दुसरे वैशिष्ट्य आहे ते त्यातील संपूर्ण समाजाला एकत्र आणण्याची दिसून येणारी भावना. यावेळी म्हटल्या जाणार्‍या लोकगीतांतून आपल्याला समाजमन कळते. व्रत करणार्‍या महिला सूर्यदेवाकडे मुलीची कामना करतात, असे हे एकमेव व्रत आहे.

एका गीतात सूर्यदेव महिलेच्या तपश्‍चर्येने प्रसन्न होतात. सूर्यदेव म्हणतात, ‘‘माग, तुझ्या मनात जे आहे, ते मागून घे.’’ सूर्यदेवाच्या वराने प्रसन्न झालेली ती स्त्री मग एक एक गोष्ट मागू लागते. नांगर – बैल, नोकर – चाकर, गाय, मुलगा – सून मागतेच, पण तिला मुलगीही हवी आहे. ती म्हणते, एक सुशील मुलगी आणि पंडित (हुशार, सुशिक्षित) जावईही दे. सूर्यदेव प्रसन्न होत तिच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन देतात आणि म्हणतात, ‘‘तू गुणांचे आगर आहेस. संसाराला हवे ते सर्व हुशारीने मागून घेतलेस.’’ ही स्त्री सर्वगुणसंपन्न आहे. संसारासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टी तिने मागून घेतल्या आहेत. सूर्यदेव तिच्या हुशारीचे कौतुक करतात. ती आर्थिक उन्नतीसाठी नांगर, बैल, औत मागते, कारण ती कृषिप्रधान कुटुंबातील आहे. नोकर – चाकर मागते, गाय मागते, मुलगा – सून मागताना त्याच बरोबर मुलगी आणि जावईही मागते. भारतीय समाजाची ही दृष्टी आहे. मुलगा हवाच, पण मुलीशिवाय घराला शोभा नाही.
ग्रामीण जीवनात ‘कुंआरे आंगन’ असा एक शब्दप्रयोग आहे. ज्या अंगणात मुलीचे लग्न झाले नाही, अशा अंगणासाठी हा शब्दप्रयोग केला जातो. भावाकडील एखाद्या कार्यक्रमात बहीण नाचली नाही, तर अंगण सुने आणि कार्यक्रम फिका पडला असे मानले जाते. आज अनेक सामाजिक कारणांमुळे मुली ह्या ओझे वाटू लागल्या आहेत. मुलगा – मुलगी असली की, कुटुंबाला पूर्णत्व येते. आमचे अनेक सण व समारंभ तर मुलींशिवाय पूर्णच होत नाहीत.

समाजपुरूषाला लोकगीतांच्या माध्यमातून ज्ञात झाले की, समाज आणि परिवाराला मुलगी ही कधीच ओझे झालेली नाही. मुलीची कामना प्रत्येक आईवडील करतात. मुली पालकांना अधिक सुख देतात. वर्तमानकाळातील कुप्रथा आणि ‘एकच मूल’ हा आग्रह मुलींना आईच्या गर्भात संपवत आहे, पण समाजाचे समूहमन मुलींचा नेहमीच गौरव करीत आलेले आहे. या सण – उत्सवांतील गाणीच ते दृगोच्चर करतात.
आपण शहरीकरण आणि आधुनिकीकरणाच्या रेट्यात या रीतीभाती, सण – उत्सवांचा गाभाच विसरत चाललो आहोत. आपले सण बाजारपेठ केंद्रित होऊ लागले आहेत. त्यातील आस्था, विश्वास, उत्साह लोप पावत चालला आहे. वाढदिवस असो की, भाऊबीज, कोणी केवढी मोठी भेटवस्तू दिली याचीच चर्चा असते.
छठपूजा (कार्तिक शुद्ध षष्ठी) ही सूर्योपासना आहे. सूर्यामुळेच विश्वाचे रहाटगाडगे अव्याहत सुरू आहे. सूर्य केवळ प्रकाश देत नाही, तर तो जीवन देतो. सूर्याची वैशिष्ट्ये आणि त्याचे महत्त्व या लोकगीतांतून समोर येते. अन्न, धन, लक्ष्मी या भौतिक गोष्टी सूर्यामुळेच शक्य होतात. छठपूजेच्या वेळी महिला सूर्याचे आभार मानतात आणि त्याचा महिमा मान्य करतात.

औपचारिक शिक्षणात या सण – उत्सवांचे महत्त्व हवे त्या पद्धतीने सांगितले जात नाही. आज माणसे डॉक्टर, अभियंते, संगणक अभियंते होतात. लेले नाही. आपली जीवनमूल्ये बदलत आहेत. आपले लोकजीवन विकासाच्या झपाट्यात मागे पडते आहे, मोडून पडते आहे. शास्त्र, पुराण आणि प्रवचनाशिवायही अनेकांना सामाजिक शहाणपण येई, त्याचे श्रेय लोकगीतांना जाते. आधुनिक शहरी जीवनातून ही लोकगीते लुप्तच झालेली असल्याने लोकांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मुली ओझे वाटत आहेत आणि स्त्री सबलीकरणाच्या घोषणा द्याव्या लागत आहेत.

छठपूजेत स्त्रीलाच महत्त्व आहे. सूर्याबरोबर तीच संवाद साधत असते. त्यांच्या प्रार्थनेमुळेच सूर्यदेव आपल्याला आवश्यक त्या सुखसोयी देतो. स्त्री हीच कुटुंबाचा आधार आहे. तिची सर्व व्रतवैकल्ये कुटुंबाला सुखी – समाधानी ठेवण्याची कामना करतात. त्यामुळेच भाऊ, नवरा, वडील, मुले, नातवंडे दीर्घायुषी व्हावीत म्हणून त्या व्रतवैकल्ये करीत असतात. सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. त्वदीयम् वस्तु गोविन्दम् तुभ्यमेव समर्पये. यावेळी सुखसाधनांबरोबर मुलींचीही कामना केली जाईल. या व्रताचा हा भावार्थ समाजापर्यंत जाण्याची गरज आहे.