चोवीस तासांत २६१ बाधित, सक्रिय रुग्ण ८५६

0
13

>> चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी रेट ७.२ टक्क्यांवर

>> तीन दिवसांत ५४६ नवे बाधित

राज्यात नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ कायम आहे. चोवीस तासांत नवीन रूग्णाच्या संख्येने अडिचशेचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन २६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून १ कोरोना बळीची नोंद झाली आहे. राज्यातील बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ७.२ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ८५६ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३५२१ एवढी झाली आहे.

पणजीत १२० बाधित
राजधानी पणजीसह पर्वरी, मडगाव, चिंबल, कासावली, कुठ्ठाळी आदी भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. पणजीतील बाधितांची संख्या सर्वाधिक १२० एवढी झाली आहे. मडगाव येथे ८७, पर्वरी येथे ५५, कासावली येथे ७२, चिंबल येथे ४०, कुठ्ठाळी येथे ५६, लोटली येथे ३९, म्हापसा येथे ३८ बाधित आहेत.

तीन दिवसांत ५४३ रुग्ण
राज्यात तीन दिवसांत ५४३ कोरोना बाधित आढळून आले आहेत. राज्यातील सक्रिय बाधितांची संख्या १ हजाराच्या जवळ येऊन ठेपली आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन ३६१० स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील २६१ नमुने बाधित आढळून आले.

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ६१ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५८ टक्के एवढे खाली आले आहे. कोरोनाची लक्षणे जाणवल्याने एका बाधिताला इस्पितळात दाखल करून घेण्यात आले आहे. तर, बरे झालेल्या दोघांना इस्पितळांतून घरी पाठविण्यात आले आहे.

नागरिक पॉझिटिव्ह
दोन रशियन नागरिक आणि इंग्लंडमधून आलेला एक स्थानिक नागरिक असे तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांचे नमुने ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दाबोळी विमानतळावर काल दोघे रशियन नागरिक आले होते. तिसरा कोरोना पॉझिटिव्ह स्थानिक असून इंग्लंडमधून परतल्यानंतर आठव्या दिवशी त्याची कोविड चाचणी करण्यात आली. त्यावेळी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तिघांना राज्य सरकारच्या विलगीकरण सुविधेमध्ये ठेवण्यात आले आहे.

विदेशातून आलेल्यांची दाबोळी विमानतळावर
आरटीपीसीआर चाचणी करणार ः विश्‍वजीत

दाबोळी विमानतळावर विदेशातून येणार्‍या सर्व प्रवाशांची कोविड तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, प्रवाशांची रॅपिड कोविड आरटी-पीसीआर चाचणीसाठी १५०० रुपये शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.

कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर दाबोळी विमानतळावर विदेशातून येणार्‍या सर्व प्रवाशांची कोविड चाचणी केली जाणार आहे.

यापूर्वी, केवळ २ टक्के प्रवाशांची कोविड चाचणी केली जात होती, असे आरोग्यमंत्री राणे यांनी म्हटले आहे.

१५-१८ वयोगटातील ७२ हजार
मुलांना लस देणार ः डॉ. बोरकर

>> एका आठवड्यात लसीकरण पूर्ण करणार

राज्यातील १५ ते १८ वयोगटातील ५२९ विद्यालयांतील सुमारे ७२ हजार मुलांना कोविड लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी काल दिली.

या वयोगटातील सर्व मुलांना ३ जानेवारी २०२२ पासून लस देण्यास सुरूवात केली जाणार असून एका आठवड्यात लसीकरण पूर्ण केले जाणार आहे. या वयोगटातील लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून ७४ हजार २०० डोस प्राप्त झाले आहेत. मुलांना २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाणार आहे. लसीकरणासाठी आधारकार्डची आवश्यकता आहे. एखाद्या मुलाकडे आधारकार्ड नसल्यास पर्यायाचा विचार केला जाणार आहे, असेही डॉ. बोरकर यांनी सांगितले.

जगात आणि देशात ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पालकांनी ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर मुलांच्या लसीकरणासाठी सहकार्य करावे. मुलांना विद्यालयातून लस दिली जाणार आहे. विद्यालयात लस देण्यास अडचण येणार्‍या मुलांना जवळच्या आरोग्य केंद्रात लस दिली जाणार आहे. या लसीकरणासाठी योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुलांच्या लसीकरणाबाबत शिक्षण खात्याला माहिती देण्यात आली आहे, असेही डॉ. बोरकर यांनी सांगितले.