राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही मात्र बाधा झालेले ८० रुग्ण सापडले. तसेच गेल्या चोवीस तासांत ५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील सध्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ९७६ झाली असून राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३२९७ एवढी आहे. काल राज्यात गेल्या चोवीस तासांत ६०१४ स्वॅब चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५७ टक्क्यांवर घसरले आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्हिटी दर २.३३ टक्के एवढा झाला आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळांतून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ७ एवढी आहे. तर गेल्या २४ तासांत इस्पितळांत भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ११ एवढी आहे.
तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवल्याने ६९ जणांनी गृहविलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मडगावात रुग्णांच्या
संख्येत पुन्हा वाढ
या घडीला राज्यात सर्वात जास्त रुग्ण मडगाव येथे असून तेथे आता रुग्णसंख्येने शंभरी पार केलेली आहे. सध्या मडगावात कोरोनाची रुग्णसंख्या १२४ एवढी आहे. त्या खालोखाल पणजीत ७६, पर्वरीत ६९, कांदोळी ५२, शिवोली ५२ अशी रुग्णसंख्या आहे.
राज्यात सध्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १,७१,५९९ एवढी झाली आहे. तर एकूण कोरोना रुग्णसंख्या १,७५,८७२ एवढी झाली आहे. आतापर्यंत घरी विलगीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२२,९४५ एवढी असून इस्पितळात आतापर्यंत भरती झालेल्यांची संख्या २९,४०८ एवढी आहे.