>> रविवारी ७३ नव्या बाधितांची नोंद
राज्यात चोवीस तासांत कोरोनामुळे ३ बळींची नोंद झाली असून त्यामुळे राज्यातील एकूण बळींची संख्या ३३२९ एवढी झाली आहे.
नवीन ७३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ७१० झाली आहे. तर गेल्या चोवीस तासांत राज्यातून आणखी ९३ रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात कोरोना महामारीची परिस्थिती तूर्त नियंत्रणाखाली असली तरी, सतर्कता बाळगण्याची गरज आहे.
काल रविवारी इस्पितळातून १२ रुग्णांना घरी पाठविण्यात आले. तसेच १२ कोरोनाबाधित रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. ६१ जणांनी होमआयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. बरे होणार्या रुग्णांचे प्रमाण ९७.७२ टक्के एवढे आहे.
काल रविवारी राज्यात कोरोनासाठी ५१९२ जणांची स्बॅव चाचणी करण्यात आली.
सर्वाधिक रुग्णसंख्या मडगावात
या घडीला राज्यात सर्वात जास्त रुग्ण मडगाव येथे असले तरी ती संख्या १०० पेक्षा खाली आहे. सध्या मडगावात कोरोनाची रुग्णसंख्या ७१ एवढी आहे. त्या खालोखाल पणजी ५२, चिंबल ४३, कांदोळी व फोंड्यात प्रत्येकी ३८, म्हापसा व वास्को ३४, पर्वरी ३१, काणकोण २५, कुठ्ठाळी २४, शिवोली २३, पेडणे व डिचोली प्रत्येकी २२, अशी रुग्णसंख्या आहे.
राज्यात सध्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १,७३,०७४ एवढी झाली आहे. तर एकूण कोरोना रुग्णसंख्या १,७७,११३ एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत १३,९६,५५८ एवढ्या स्वॅब चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत घरी विलगीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२३,९४९ एवढी असून इस्पितळात आतापर्यंत भरती झालेल्यांची संख्या २९,६४५ एवढी आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.