चोवीस तासांत कोरोनाचे १३१ नवे रुग्ण, ४ बळी

0
6

राज्यात चोवीस तासांत नवीन १३१ कोरोनाबाधित आढळून आले असून आणखी ४ कोरोना बळींची नोंद झाली आहे. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ७.३९ टक्के एवढे आहे. राज्यातील सक्रिय रूग्णसंख्या अडीच हजारांच्या खाली आली असून ती २ हजार ३३३ एवढी झाली आहे.

राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३७७३ एवढी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत कोविड स्वॅबच्या चाचण्यांमध्ये घट झाली असून केवळ १७०२ स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यात १३१ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले आहेत.

राज्यात मागील चोवीस तासांत आणखी २८२ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५० टक्के एवढे आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत ६ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले आहे. राज्यात कोविड लशीच्या बूस्टर डोसला चांगला प्रतिसाद लाभत नाही. केवळ २६.७९ टक्के लाभार्थींनी बूस्टर डोस घेतला आहे.