चेन्नई सुपर किंग्जने ओढवला पराभव

0
100

धोनीसह मधल्या फळीतील फलंदाजांच्या टुकार प्रदर्शनामुळे चेन्नई सुुुपर किंग्जने काल बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सला विजय बहाल करत स्वतःवर पराभव ओढवला. इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या मोसमातील या २१व्या सामन्यात केकेआरच्या १६७ धावांना उत्तर देताना सीएसकेला ५ बाद १५७ धावांपर्यंत मजल मारता आली.

धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला शेन वॉटसन व फाफ ड्युप्लेसी यांनी ३० धावांची सलामी दिली. मावीने ड्युप्लेसीला बाद करत ही जोडी फोडली. अंबाती रायडू व वॉटसन यांनी यानंतर दुसर्‍या गड्यासाठी ६९ धावांची भागीदारी रचली. तेराव्या षटकातील पहिल्या चेंडूवर नागरकोटीने रायडूला बाद करताच सामना कोलकाताच्या बाजूने झुकायला सुरुवात झाली. रायडू परतला तेव्हा चेन्नईला ४७ चेंडूंत केवळ ६७ धावांची गरज होती. त्यांचे ८ गडी शिल्लक होते. परंतु, त्यांना हे जमले नाही. त्यांच्या फलंदाजांनी स्वतःवर पराभव ओढवून घेतला. चौथ्या स्थानावर उतरलेल्या धोनीला १२ चेंडूंत केवळ ११ धावा करणे शक्य झाले. केदार जाधवने १२ चेंडू खेळून अवघ्या ७ धावा करत संघाच्या पराभवात मोलाचे ‘योगदान’ दिले. रवींद्र जडेजाने शेवटच्या तीन चेंडूंत एक षटकार व दोन चौकार ठोकले. परंतु, सामन्याचा निकाल त्यापूर्वीच निश्‍चित झाला होता.
तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली.

कोलकाताने नारायणला सलामीला पाठवण्याच्या प्रयोगाला कालच्या सामन्यात तिलांजली देताना राहुल त्रिपाठी याला शुभमन गिल याच्यासह डावाची सुरुवात करायला पाठवले. राहुलने सलामीला मिळालेल्या संधीचे सोने करताना ५१ चेंडूंत ८१ धावांची दमदार खेळी केली. ८ चौकार व ३ षटकारांनी त्याने आपली अर्धशतकी खेळी सजवली. कोलकाताच्या इतर फलंदाजांनी मात्र साफ निराशा केली. उर्वरित सर्व फलंदाजांनी मिळून ६९ चेंडूंत केवळ ७६ धावा केल्या. शार्दुल ठाकूरने शुभमन गिल याला धोनीकरवी झेलबाद करत चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. गिल व त्रिपाठी यांनी पहिल्या गड्यासाठी ३७ धावा जोडल्या. पीयुष चावला याच्या जागी संधी मिळालेल्या कर्ण शर्मा याने नितीश राणा याला तंबूची वाट दाखवली. जडेजाने ‘लॉंग ऑन’वर त्याचा सोपा झेल घेतला. नारायण चौथ्या स्थानावर फलंदाजीस उतरला. प्रत्येकी एक चौकार व षटकार ठोकून त्याने चांगली सुरुवात केली होती. परंतु, सीमारेषेवर जडेजाच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे त्याला तंबूची वाट धरावी लागली. जडेजाने झेपावत झेल घेतल्यानंतर सीमारेषेला शरीर लागणार हे जाणून चेंडू ड्युप्लेसीकडे उडवत नारायणला माघारी धाडले. ऑईन मॉर्गन व आंद्रे रसेल या टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट फलंदाजांकडून खूप अपेक्षा होती. परंतु, त्यांनी भ्रमनिरास केला. राहुल त्रिपाठीने एक टोक लावून फटकेबाजी सुरूच ठेवल्याने कोलकाताना १६७ धावांपर्यंत पोहोचता आले. पॅट कमिन्स १७ धावा करून नाबाद राहिला.

धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स ः त्रिपाठी झे. वॉटसन गो. ब्राव्हो ८१ (५१ चेंडू, ८ चौकार, ३ षटकार), गिल झे. धोनी गो. ठाकूर ११, राणा झे. जडेजा गो. शर्मा ९, नारायण झे. ड्युप्लेसी गो. शर्मा १७, मॉर्गन झे. धोनी गो. करन ७, रसेल झे. धोनी गो. ठाकूर २, कार्तिक झे. ठाकूर गो. करन १२, कमिन्स नाबाद १७, नागरकोटी झे. ड्युप्लेसी गो. ब्राव्हो ०, मावी झे. धोनी गो. ब्राव्हो ०, चक्रवर्ती धावबाद १, अवांतर १०, एकूण २० षटकांत सर्वबाद १६७
गोलंदाजी ः चहर ४-०-४७-०, करन ४-०-२६-२, ठाकूर ४-०-२८-२, शर्मा ४-०-२५-२, ब्राव्हो ४-०-३७-३

चेन्नई सुपर किंग्ज ः वॉटसन पायचीत गो. नारायण ५० (४० चेंडू, ६ चौकार, १ षटकार), ड्युप्लेसी झे. कार्तिक गो. मावी १७, रायडू झे. गिल गो. नागरकोटी ३०, धोनी त्रि. गो. वरुण ११, करन झे. मॉर्गन गो. रसेल १७, जाधव नाबाद ७, जडेजा नाबाद २१, अवांतर ४, एकूण २० षटकांत ५ बाद १५७
गोलंदाजी ः कमिन्स ४-०-२५-०, मावी ३-०-३२-१, चक्रवर्ती ४-०-२८-१, नागरकोटी ३-०-२१-१, नारायण ४-०-३१-१, रसेल २-०-१८-०