चेन्नईनचा धुव्वा उडवित गोव्याची दमदार सलामी

0
119

गतउपविजेत्या एफसी गोवाने सहाव्या हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) माजी विजेत्या चेन्नईन एफसीचा ३-० असा धुव्वा उडवित दमदार सलामी दिली. नेहरू स्टेडियमवर खाते उघडण्यासाठी अर्ध्या तासापर्यंत प्रतिक्षा करावी लागलेल्या गोव्यातर्फे स्पेनचा स्टार स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याचा दुसर्‍या सत्रातील गोल स्थानिक प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरला.

कोरोमीनासने मागील मोसमात १६ सामन्यांमध्ये २० गोलांचा धडाका लावत गोल्डन बूटचा किताब जिंकला होता. यावेळी त्याने फॉर्म कायम राखला. गेल्या वर्षी गोव्याने साखळीतील १८ सामन्यांत ३६ गोलांचा पाऊस पाडला होता. यावेळी त्यांनी सलामीला स्ट्राईक रेट कायम राखला. त्यामुळे सुमारे १३ हजार प्रेक्षक आनंदाने बेभान झाले.
स्पेनचे मार्गदर्शक सर्जिओ लॉबेरा यांच्या संघाने आक्रमक आणि धडाकेबाज खेळाचा लौकीक राखला. चेन्नईनला गतमोसमात अखेरच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्यांच्यासाठी प्रारंभीचा हा निकाल निराशाजनक ठरला.

भारतीय खेळाडू सैमीनलेन डुंगल याने गोव्याचे खाते उघडले होते. त्यानंतर स्पेनच्या कोरोमीनास व कार्लोस पेना यांनी लक्ष्य साधले. पेनाचा गोल फ्री किकवर झाला, त्यावेळी नऊ मिनिटे बाकी होती. गोव्याच्या विजयात गोलरक्षक महंमद नवाझ यानेही आपली भूमिका चोखपणे पार पाडली. त्याने ७३व्या मिनिटास लालीयनझुला छांगटे याची किक झेप टाकत अडविली.

अर्ध्या तासाच्या खेळानंतर गोव्याने खाते उघडले. या गोलमध्ये त्यांना दैवाची साथ मिळाली. उजवीकडून स्ट्रायकर मानवीर सिंगने चेंडू पुढे नेला. चेंडूवरील ताबा निसटत असतानाच त्याने कसाबसा बॉक्सच्या मध्यभागी फटका मारला. चेन्नईनचा बचावपटू एली साबीया याच्या पायाला लागून चेंडू डुंगलपाशी गेला आणि तेथून थेट नेटमध्ये धडकला. त्यावेळी चेन्नईनचा गोलरक्षक विशाल कैथ निरुत्तर होता.
एका तासाच्या खेळानंतर गोव्याने आघाडी वाढविली. ही चाल मानवीरनेच रचली. त्याने उजवीकडून दिलेला पास जॅकीचंदने चपळाईने कोरोमीनासकडे सोपविला. कोरोमीनासने उत्तम नियंत्रणासह चेंडूला नेटची दिशा दिली.

चेन्नईनला पूर्वार्धात २१व्या मिनिटाला चांगली संधी मिळाली होती. कॉर्नरवर एली साबियाला चेंडू मिळाला. त्याने प्रतिस्पर्ध्याला चकवून हेडींग केले, पण गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझने बचाव करीत चेंडू बाहेर घालविला. त्यावर कॉर्नर मिळाला, पण तो फलदायी ठरला नाही. गोव्याला तिसर्‍याच मिनिटाला फ्री किक मिळाली. कैथने चेंडू थोपविला. बॉक्सलगत मुर्तडा फॉलने बायसिकल किक मारली, पण ती फसली. हा प्रयत्न मात्र थरारक ठरला.

पाचव्या मिनिटाला जॅकीचंद सिंगने उजवीकडून घोडदौड केली, पण त्याला जेरी लालरीनझुलाने रोखले. चेंडू बाहेर गेल्याने मिळालेल्या कॉर्नरवर काही घडले नाही. १२व्या मिनिटाला चेन्नइनचा मध्यरक्षक ड्रॅगोस फर्तुलेस्क्यू याने आगेकूच केली, पण बॉक्समध्ये त्याला सेरीटॉन फर्नांडीसने पाडले. त्यावेळी चेन्नईनने पेनल्टीचे अपील केले, पण पंच प्रांजल बॅनर्जी यांनी ते फेटाळून लावले.

यानंतर मानवीरने नेटच्या उजव्या कोपर्‍याच्या दिशेने मारलेला चेंडू कैथने डावीकडे झेपावत अडविला. २५व्या मिनिटाला चेन्नईनला फिनिशिंग करता आले नाही. आंद्रे शेम्ब्रीने लालीयनझुला छांगटेला पास दिला, त्यावर छांगटने नवाझच्या अगदी जवळ चेंडू मारला. त्यामुळे ही संधी गेली.
दोन्ही सत्रांत स्थिरावण्यास वेळ घेतलेल्या गोव्याने अखेरीस मोठ्या फरकाचा विजय साकार करीत तीन गुण वसूल केले.