चेन्नईच सुपरकिंग्ज!

0
126
Chennai Super Kings players pose after winning the 2018 Indian Premier League (IPL) Twenty20 final cricket match between Chennai Super Kings and Sunrisers Hyderabad at the Wankhede stadium in Mumbai on May 27, 2018. / AFP PHOTO / PUNIT PARANJPE / ----IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE----- / GETTYOUT

सलामीवीर शेन वॉटसनच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या बळावर सनरायझर्स हैदराबादला दिमाखात धूळ चारत दोन वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जने सात वर्षांनंतर तिसर्‍यांदा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला. यापूर्वी २०१० आणि २०११ मध्ये चेन्नईचा संघ चॅम्पियन ठरला होता. त्यानंतर टीमला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

विशेष म्हणजे हैदराबादला नमवूनच चेन्नईने यंदाच्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीत धडक दिली होती. त्यामुळे हैदराबादला पुन्हा एकदा धूळ चारून चेन्नईने किताबावर आपले नाव कोरले आहे. या सामन्यात सुरुवातीपासूनच चेन्नईचे पारडे जड होते. यापूर्वीही दोन्ही संघ ९ वेळा समोरासमोर आले होते. यामध्ये चेन्नईचा ७ सामन्यांत तर हैदराबादचा २ सामन्यात विजय झाला होता. या सामन्यात चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सुरुवातीला फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने २० षटकात ६ बाद १७८ धावा केल्या. १७९ धावांचे लक्ष्य चेन्नई सुपरकिंग्सने १८.३ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केले. चेन्नई सुपरकिंग्जतर्फे शॉन वॉटसनने शानदार खेळ करताना ५१ चेंडूत शतक पूर्ण केले. सनरायझर्स हैदराबादचा एकही गोलंदाज विशेष कामगिरी करू शकला नाही. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळण्यात आला.

या सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरला तो सलामीवीर शेन वॉटसन. वॉटसनने रैनासह दुसर्‍या विकेटसाठी ५७ चेंडूंत ११७ धावांची फटकेबाज भागीदारीदेखील रचली. आतापर्यंतच्या आयपीएल फायनलमध्ये नाबाद ११७ धावांची खेळी करणारा वॉटसन हा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने ५७ चेंडूंत नाबाद ११७ धावा तडकावल्या. आपल्या या ९४ मिनिटांच्या खेळीत वॉटसनने ११ चौकार आणि ८ षटकारांची आतषबाजी केली. २००८ मध्ये पार पडलेल्या पहिल्या आयपीएलमध्ये शेन वॉटसन स्पर्धेचा मानकरी ठरला होता. काल दहा वर्षांनीदेखील आपल्यात धमक कायम आहे असल्याचे त्याने दाखवून दिले.