>> कडक थंडीमुळे घेतला निर्णय
>> ५० हजार सैनिक होते तैनात
लडाख परिसरातील वाढत असलेल्या प्रचंड थंडीमुळे चीनने आपल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ९० टक्के सैनिकांना परत मागे बोलावले आहे.
पूर्व लडाखमध्ये सीमावाद सुरू झाल्यानंतर चीनने तिथे मोठ्या प्रमाणात पीपल्स लिबरेशन आर्मीचे सैनिक तैनात केले होते. परंतु सध्या तिथे पडत असलेल्या कडक थंडीमुळे या सैनिकांतील जवळजवळ ९० टक्के सैनिकांना चीनने मागे बोलावले आहे.
गेल्या वर्षी एप्रिल ते मे या कालावधीनंतर चीनने लडाखच्या पूर्वेकडील भारतीय हद्दीजवळ जवळपास ५०,००० सैन्य तैनात केले होते.
चीनकडून गेल्या वर्षी तैनात केलेल्या सैनिकांतील ९० टक्के सैनिकांना परत बोलावण्यात आले आहे. वाढलेल्या थंडीमुळे निर्माण झालेली परिस्थिती चीनी सैन्याला अनुकूल नसल्याने सैनिकांना माघारी बोलावले आहे.
पँगॉंग लेक क्षेत्रात सैनिक तैनात असतानाही पीपल्स लिबरेशन आर्मीकडून जवळजवळ दररोज त्यांच्या चौक्यांवरील व्यक्तींची माघारी पाठवून दुसर्या व्यक्तीची नेमणूक करण्यात येत होती.
दोन वर्षांपासून भारतीय सैन्यदेखील या उंच भागात तैनात करण्यात येत आहे. पूर्व लडाखमध्ये असणार्या उंच भांगामध्ये मोठ्या प्रमाणात जीवघेणी थंडी पडते. त्यामुळे सैन्य थोड्या थोड्या काळाने खाली बोलावले जाते. दर वर्षी सुमारे ४०-५० टक्के सैनिक खाली बोलावले जातात.
गलवान संघर्षानंतर तणाव
गलवान खोर्यातील संघर्षानंतर गेल्या वर्षी एप्रिल-मेपासून भारत आणि चीनने पूर्व लडाख आणि वास्तविक नियंत्रण रेषेच्या इतर भागात प्रचंड सैन्य तैनात केले होते. या वर्षाच्या सुरूवातीस, दोन्ही देशांनी पँगॉंग तलाव क्षेत्रात आपले तैनात केलेले सैन्य मागे घेण्याचे व तेथील गस्त थांबविण्याचे मान्य केले. मात्र तरीही त्या परिसरात अद्याप सैन्याच्या तुकड्या गस्त घालत आहेत.
दरम्यान, भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे वारंवार लडाख सेक्टरला भेट देत आहेत आणि परिस्थितीशी सामना करण्यासाठी सैनिकांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांच्यासह चायना स्टडी ग्रुपही परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी सूचना देत असून चीनशी चर्चेदरम्यान मार्गदर्शक सूचना करत आहेत.