उत्तर प्रदेशातील पुढील विधानसभा निवडणूक योगींच्या नेतृत्वाखाली

0
64

>> दिल्लीतील भाजपच्या बैठकीत निर्णय

उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी २०२२ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक ही योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वात लढली जाईल. याशिवाय यूपीत मंत्रिमंडळाचा विस्तार आता होणार नाही, असा निर्णय काल भाजपच्या नवी दिल्लीतील बैठकीत झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल रविवारी भाजपची महत्त्वाची बैठक झाली. यावळी पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, सरचिटणीस आणि महामंत्री बी. एल संतोष आणि अरुण सिंह हे उपस्थित होते.

उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आमदारांचे रिपोर्ट कार्ड तयार करत आहे. कामगिरीच्या आधारावरच निवडणुकीची उमेदवारी दिली जाईल, असाही यावेळी निर्णय घेण्यात आला. उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि गंगा नदीत वाहत्या मृतदेहांच्या वृत्तांनंतर योगी सरकारवर जोरदार टीका केली जात होती.

यानंतर पंतप्रधा मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दोन महत्त्वाच्या बैठका झाल्या. यात उत्तर प्रदेशमधील सरकारच्या स्थितीबाबत चर्चा झाली. कोरोनामुळे बिघडलेली राज्य सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी काय करता येईल? याची योजनाही आखली गेली.

दरम्यान, उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून बैठका चालू असून त्यात कॅबिनेटमधील बदलांसह निवडणूक प्रचारावरही चर्चा सुरू आहे. अलिकडेच पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सरचिटणीसांची दोन दिवस बैठक घेतली होती. भाजपने रविवारी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदम्यान कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. येत्या काही दिवसांत भाजपतर्फे देशभरात १ लाख व्हँटिलेटर्स तयार करणार असून वैद्यकीय उपकरणे हाताळण्याच्या प्रशिक्षणाचे आयोजन करणार आहे. ही बैठक जे. पी. नड्डा यांनी बोलावली होती.