विश्वनाथ कोल्हापुरे
(लता मंगेशकर यांचे आतेभाऊ)
आपल्या गोड आवाजाने रसिकांच्या हृदयाची पकड घेणारी हृदया. हो हृदयाच! बारशाच्या दिवशी पाळण्यात तिचे हेच नाव ठेवलेले होते. मला वाटते गडकर्यांच्या लतिकेमुळे हृदयाची ‘लता’ झाली, कारण दीनानाथांची ‘भावबंधन’मधील भूमिका अगदी पेटंट होती. त्यावेळी लतासाठी घेतलेल्या भातुकलीतील भांड्यांवर नावे होती, ‘हृदया दीनानाथ मंगेशकर.’
लतेचे वडील हे माझे मामा. मी त्यांना अप्पा म्हणत असे. ते ज्योतिषावर बोलताना सांगायचे, ‘विश्वनाथ, लतेच्या पत्रिकेतील गुरु, चंद्र, शुक्र, शनि आणि राहू यांच्या शुभयोगामुळे ही मुलगी मोठी कीर्तिवंत होईल.’ त्यांचे बोल अक्षरशः खरे ठरले. अखेरच्या दिवसांत ते तिला म्हणायचे. ‘लते, गळ्यातला पंचम सांभाळ. तो तुला सर्व काही देईल. हे दोन तंबोरे आणि ही चिजांची वही हीच माझी तुला देणगी.’ हे हृदयस्पर्शी बोल ऐकताना सर्वांचे मन गहिवरून येई.
पित्याचे पारणे फिटले
लतेला वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षांपासून गाणी म्हणण्याचा अन् लक्षपूर्वक ऐकण्याचा नाद होता. त्यावेळी तिच्या कानांवर येणारी गाणी म्हणजे नाटकांतील पदे आणि चित्रपटांतील सैगलची गाणी. लता तेव्हाही अगदी सहज गायची. ही तिची आवड लक्षात येताच दीनानाथराव तिला निवडक रागदारी चिजा सांगू लागले. ‘आलीरी मै जागी’ ही खंबावतीतील चीज वयाच्या दहाव्या वर्षी झालेल्या तिच्या व दीनानाथांच्या जलशात तिने प्रथम गायली. ती ऐकताना पित्याला गहिवरून आले. त्याच्या कानांचे पारणे फिटले. मी स्वतः हा गोड प्रसंग पाहिलेला आहे.
‘आली तेरी जोबन’ (सुगराई), ‘बसंत आयी’ (बहार), ‘सदारंग नित उठकर देत दुहाई’ (हमीर) अशा अनेक रागांतील चिजा त्या बालवयातही ती फार चांगली म्हणायची. लतेबरोबरच मीना, आशा यांनाही दीनानाथराव चिजा सांगत. त्या तिघींनाही एकजा चीज सांगत. त्या तिघींनाही एकदा चीज ऐकवली, की बैठक मारून शिकवत बसायची गरजच पडायची नाही. वयाच्या बाराव्या वर्षी एखाद्या चांगल्या गवयाइतका चिजांचा संग्रह लताजवळ होता. ‘हे हवारे गया’ ही मीनाची आवडती चीज अन् ‘महादेव शंकर’ ही आशाची आवडती चीज. चारचौघांत मोठ्या कौतुकाने वडील आपल्या गुणी कन्यकांना या चिजा गायला सांगत.
मंचावरचे पहिले पाऊल
सोलापूरच्या नूतन संगीत थिएटरमध्ये तारीख ९ सप्टेंबर १९३९ च्या रात्री पितापुत्रीच्या जलशात लताचे अगदी प्रथमच स्टेजवर पाऊल पडले. लताचा प्रथमच जलसा आणि तो ‘नूतन संगीत’मध्ये. नियतीला असे जणू सुचवायचे होते, की ही इवलीशी बालिका भविष्यकाळात संगीतात काही नूतन करून दाखवील. सोलापूरकरांनी बापलेकीचे मनापासून कौतुक केले. खंबावतीनंतर ‘ब्रह्मकुमारी’तील दीनानाथांचे ‘मधुमीलनात या’ हे पद लताने सुरखे गायले. त्या वेळेपासून लता आणि संगीत यांच्या झालेल्या मधुमीलनाचे फळ कोट्यवधी रसिकांनी अनुभवले. त्या जलशाच्या यशानंतर ‘बलवंत’मधील गुणी बालगोपालांना जमवून ‘बाळबलवंत’तर्फे ‘गुरुकुल’ या नाटकाचा प्रयोग पंढरपूर येथे लताने केला. त्यात तिने कृष्णाची, पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी सांदिपनीपुत्र कौशिकाची, चंद्रकांत गोखले यांनी सांदिपनीची अशा भूमिका केल्या. मीना, आशा, उषा या मंगलाचरणात होत्या. बालकलाकारांचा इतका गुणी संच आणि त्यांचे दिग्दर्शन करणारे होते कै. दिनकर कामण्णा. प्रयोग फारच सुंदर झाला. त्याच मुक्कामात ‘पुण्यप्रभाव’मधील बाल युवराजाच्या भूमिकेत लता रंगभूमीवर आली. युवराजाची तीनही पदे लतेने दणकावून म्हटली. ‘सौभद्र’मधील नारद, ‘भावबंधन’मधील कुसुम, ‘चौदावे रत्न’मधील तान्या या भूमिकाही त्यानंतर तिने गाजवल्या. विशेषतः तान्याची ‘बघितलं ग्वाड पाखरू’ ही लावणी तिने फार गोड ठसक्यात म्हटली.
मोठेपणी तिने फक्त एकदाच नाटकात काम केले. अठ्ठेचाळीस साली दीनानाथांच्या पुण्यतिथीच्या वेळी चित्तरंजन कोल्हटकर (घनश्याम), पंढरीनाथ कोल्हापुरे (कामण्णा) यांच्यासमवेत ती ‘लतिका’ झाली. भालचंद्र पेंढारकर ‘प्रभाकर’ झाले आणि छोट्या मीनाने ‘बिंदू’ची खेळकर भूमिका केली. रंगभूमीवरील एकेकाळच्या प्रसिद्ध कलावंतांची ही मुले एका रंगमंचावर पाहण्याचे भाग्य फक्त मुंबईकरांना व पुणेकरांनाच लाभले. लतिकेची सगळीच पदे चांगली झाली, पण माझ्या मनात घोळत राहिले ते तिचे ‘सकल चराचरी या तुझा असे निवास’ हे पद. तसे पाहिले तर बालपणापासून लताचा देवपूजेकडे विलक्षण ओढा. पाच-सहा वर्षांची असल्यापासून नित्यनियमाने तिची देवपूजा चाललेली आहे. या बालवयात एका भांड्यात देवांच्या सर्व मूर्ती नेऊन बुडविल्या, की तिच्या देवांची आंघोळ व्हायची. मग एका रांगेने सर्व देवांना उभे करून हळदीकुंकू वाहिले जाई. दुसरा एक लतेचा आवडता खेळ सांगलीला असताना चालायचा. चाळीतल्या सर्व मुलांना एकत्र जमवून त्या काळी गाजलेल्या ‘तुकाराम’ बोलपटातील अभंग, संवाद अडीच-तीन तास ती म्हणत राहायची. त्यावेळी लता ‘तुकाराम’ व्हायची. वडील मंडळी हा खेळ कौतुकाने बघत बसायची. मीही त्यावेळी त्या सर्वांमध्ये एक होतो, हे केवढे मोठे समाधान आहे.