चापोली धरणात पिंजर्‍यांद्वारे १२९ टन मत्स्य पैदाशीचे लक्ष्य

0
93

काणकोण तालुक्यातील चापोली धरणात पिंजर्‍यातून मासळी पैदास करण्यासाठी मासळीची बियाणी घालून ४८ पिंजरे सोडण्यात आलेले असून त्याद्वारे खात्याला ‘बासा’ या भारतीय जातीची १२९ टन मासळी उपलब्ध होणार असल्याचे मच्छीमार खात्याच्या संचालक डॉ. शामिला मोंतेरो यांनी काल सांगितले. यापुढे टप्प्या टप्प्याने केरी, आमठाणे व पंचवाडी येथील धरणातही अशाच प्रकारे पिंजर्‍यातून मासळी पैदास करण्यात येणार असल्याचे डॉ. मोंतेरो म्हणाल्या.
पोळे समुद्रातही पिंजरे
मासळीचे पीक घेण्यासाठी काणकोण-पोळे येथील समुद्रातही मासळीची बियाणी घालून १५ पिंजरे सोडण्यात आले असल्याचे डॉ. मोंतेरो यांनी सांगितले. या पिंजर्‍यातून ‘चणक’ या जातीच्या मासळीची पैदास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोळे समुद्रात शिनाण्यांचेही पीक घेण्यात येणार आहे. हे पीक घेण्यासाठी राज्यातील मच्छीमार गटांची मदत घेण्यात येत असल्याचे डॉ. मोंतेरो यांनी नमूद केले.
खेकड्यांच्या पीकासाठीही उत्तेजन
राज्यात खेकड्यांचे पीक घेण्यास बराच वाव असल्याचे दिसून आल्याने शेतकर्‍यांना खेकड्यांचे पीक घेण्यास मत्स्यद्योग खाते उत्तेजन देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. खेकड्यांचे पीक कसे घ्यावे त्यासंबंधीचे तीन दिवशीय प्रशिक्षण शेतकर्‍यांना देण्यात येत असून आतापर्यंत २२ तुकड्यांतून असे प्रशिक्षण देण्यात आल्याचे डॉ. मोंतेरो यांनी सांगितले. जुने गोवे येथील एका फार्ममध्ये हे प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्याशिवाय महिलांच्या स्वयंसेवी गटांनाही मासळीपासून लोणचे (कोळंब्यांचे लोणचे), कोळंब्यांचे कटलेट्‌स आदी पदार्थ बनवण्याचेही प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहितीही डॉ. मोंतेरो यांनी दिली.