चांद्रयान लँडिग साईट आता अधिकृतपणे शिवशक्ती पॉईंट

0
28

>> आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाची मान्यता

इस्त्रोने पाठवलेल्या चांद्रयान-3 च्या लँडिंग साइटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 ऑगस्ट 2023 रोजी ‘शिवशक्ती’ पॉइंट म्हटले जाईल, असे सांगितले होते. त्यांच्या घोषणेनंतर सुमारे सात महिन्यांनी या नावाला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने मान्यता दिली आहे. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून करण्यात आले होते. विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.04 वाजता चंद्रावर उतरला. तीन दिवसांनंतर, पंतप्रधान मोदी यांनी, वैज्ञानिकांना भेट दिली. त्यानंतर त्यांनी चांद्रयान उतरलेल्या जागेला शिवशक्ती पॉईंट असे नाव दिले होते. आता त्याला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी भारत राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करेल. चंद्रावर लँडर ज्या ठिकाणी उतरले, त्या ठिकाणाला शिव-शक्ती पॉईंट म्हटले जाईल. तसेच चंद्रावरील ज्या बिंदूवर चांद्रयान-2 चे ठसे आहेत, त्याला ‘तिरंगा’ असे नाव दिले जाईल अशा घोषणा केल्या होत्या.

इस्रोने 30 किमी उंचीवरून 5.44 वाजता स्वयंचलित लँडिंग प्रक्रिया सुरू केली आणि पुढील 20 मिनिटांत प्रवास पूर्ण केला. चांद्रयान-3 ने 40 दिवसांत पृथ्वीभोवती 21 वेळा आणि चंद्राभोवती 120 वेळा प्रदक्षिणा घातली. चंद्रयानाने चंद्रापर्यंतचे 3.84 लाख किमी अंतर कापण्यासाठी 55 लाख किमीचा प्रवास केला.

तिसरी मोहीम
भारताची चंद्रावरची ही तिसरी मोहीम होती, पहिल्या मोहिमेत पाण्याचा शोध लागला होता. चांद्रयान-1 चे प्रक्षेपण 2008 मध्ये झाले होते. यामध्ये एका प्रोबचे क्रॅश लँडिंग करण्यात आले, ज्यामध्ये चंद्रावर पाणी आढळले. त्यानंतर 2019 मध्ये चांद्रयान-2 चंद्राच्या जवळ पोहोचले, पण ते उतरू शकले नाही. चांद्रयान-3 2023 मध्ये चंद्रावर उतरले. चांद्रयान-3 ने चंद्रावर सुखरूप पोहोचण्याचा संदेशही दिला.
शिवशक्ती पाईंट हे नाव अधिकृत करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाची स्थापना 1919 मध्ये झाली. आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे संशोधन, दळणवळण, शिक्षण आणि विकास यासह त्याच्या सर्व पैलूंमध्ये खगोलशास्त्राचा प्रचार आणि संरक्षण करणे हे त्याचे ध्येय आहे. या संघाने मंजूर केलेल्या सर्व नावांचा डेटाबेस गॅझेटियर ऑफ प्लॅनेटरी नामांकनावर प्रकाशित केला आहे. प्लॅनेटरी नामांकन वेबसाइटचे गॅझेटियर यूएसजीएस ज्योतिषशास्त्र विज्ञान केंद्राद्वारे राखले जाते.