केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ ‘इंडिया’ची 31 रोजी रॅली

0
4

>> आप व काँग्रेसच्या संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीने दिल्लीत मेगा रॅली काढण्याची घोषणा केली आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राजधानीतील रामलीला मैदानावर 31 मार्च रोजी ही रॅली काढण्यात येणार आहे. आप नेते गोपाल राय यांनी यावेळी बोलताना, भारत आघाडीशी संबंधित पक्षांचे सर्व मोठे नेते रामलीला मैदानावर 31 मार्च रोजी होणाऱ्या महारॅलीत सहभागी होतील असे सांगितले.
काँग्रेस नेते अरविंदर सिंग लवली यांनी, राहुल गांधींनी देशभर लोकशाही वाचवण्यासाठी लढा सुरू केला आहे. देशातील तरुणांनी या लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ज्या प्रकारे हुकूमशाही वृत्ती स्वीकारली आहे आणि देशातील लोकशाहीची हत्या केली आहे आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली आहे. हे फक्त अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल नाही.

विरोधी पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. देशात पंतप्रधानांच्या एजन्सीचा वापर करून, आमदार खरेदी करून, विरोधकांना विकत घेऊन, खोटे खटले करून आणि अटक करून संपूर्ण विरोधी पक्षाला एक एक करून संपवण्याचे कारस्थान सुरू असल्याचे सांगितले.

आपचे कार्यालय सील
निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता लागू असतानाही आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय कार्यालय सील करण्यात आले. केजरीवाल आणि विरोधी पक्षनेत्यांनी भ्रष्टाचार केला आहे, असे भाजप म्हणत आहे, मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे आरोप फेटाळले असल्याचा दावा त्यांनी केला.

कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. कथित मद्य धोरण प्रकरणात 100 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात केजरीवाल यांच्या चौकशीसाठी तब्बल नऊ वेळा समन्स बजावण्यात आले होते.

केजरीवाल चालवणार
तुरुंगातून सरकार?

कथित मद्य घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर दिल्ली सरकारच्या कारभाराचे काय होणार? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. यावर आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवणार असल्याचा दावा केला. यानंतर आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा कारभार तुरुंगातून चालवण्यास सुरूवात केली आहे.