चर्चिलविरोधात राष्ट्रवादीची अपात्रता याचिका

0
12

>> सभापती राजेश पाटणेकर यांना पत्र

चर्चिल आलेमांव यांनी सोमवारी आपली कन्या वालंका यांच्यासह तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी विधिमंडळ गटही तृणमूल कॉंग्रेसमध्ये विलीन केला. चर्चिल यांनी राजीनामा न देताच विधिमंडळ गट विलीन केल्याने निवडणुकीपूर्वीच विधानसभेत तृणमूल कॉंग्रेसचा आमदार झाला आहे. यावेळी चर्चिल यांनी, सभापतींनी कॉंग्रेसमधून फुटून आलेल्या दहा आमदारांनी कॉंग्रेस गट भाजपमध्ये विलीन केला किंवा त्या अगोदर जसा मगोपमधून फुटलेल्या दोन आमदारांनी मगोप भाजपमध्ये विलीन केला तसाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा माझा गटही तृणमूलमध्ये विलीन करायला हवा असा दावा केला.

दरम्यान डिसोझा यांनी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा न देता चर्चिल यांनी तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश केलेला असून त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. काल सभापती पाटणेकर हे बाहेरगावी असल्यामुळे आज त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे आपण उद्या पुन्हा त्यांना भेटणार असल्याचे डिसोझा यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जो विधिमंडळ गट चर्चिल आलेमांव यांनी तृणमूल कॉंग्रेस पक्षात विलीन केलेला आहे ती प्रक्रिया भारतीय राजघटनेतील १० व्या परिशिष्टातल्या तरतुदींनुसार झाली नसल्याचा दावाही डिसोझा यांनी आपल्या याचिकेतून केला आहे.
ज्या पक्षामध्ये आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विधिमंडळ गट विलीन केल्याचा दावा आलेमांव यांनी केला आहे त्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाचा विधिमंडळ गट गोवा विधानसभेत नाही. त्यामुळे आलेमांव यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळ गट नेमका कुठच्या विधिमंडळ गटात विलीन केला आहे असा प्रश्‍न डिसोझा यांनी याचिकेतून केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अविनाश भोसले यांनी, चर्चिल यांनी राष्ट्रवादी विधिमंडळ गट तृणमूलमध्ये विसर्जित करण्याअगोदर तृणमूलचा एकही आमदार नाही. मग चर्चिल यांनी कुठल्या गटात विलिनीकरण केले असा सवाल करत सभापतींना चर्चिल यांना अपात्र ठरवावेच लागेल असे सांगितले.

मगो-तृणमूल युतीची
पणजी येथे घोषणा

काल पणजीत झालेल्या तृणमूल कॉंग्रेस आणि मगो पक्षाच्या जाहीर सभेत त्यांच्या युतीची औपचारिकपणे घोषणा करण्यात आली. तृणमूल कॉंगेस पक्षाच्या अध्यक्ष व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी, राज्यसभा खासदार लुइझिन फालेरो, मगोचे नेते सुदिन ढवळीकर, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, यांच्यासह काल तृणमूलमध्ये प्रवेश केलेले चर्चिल आलेमाव व किरण कांदोळकर तसेच दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी ममता बॅनर्जी यांनी, भाजपच्या पराभवासाठी तृणमूल व मगो पक्ष एका कुटुंबाप्रमाणे काम करतील असे सांगितले. तृणमूल सत्तेवर आल्यानंतर गोमंतकीयांचेच सरकार असेल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. यावेळी सुदिन ढवळीकर, लिएंडर पेस यांचीही भाषणे झाली.