– देवेश कुसुमाकर कडकडे, डिचोली
एकट्या असहाय्य मुलीला गाठून तिच्यावर बलात्कार करण्याच्या घटना आज देशात घडत आहेत. जी भूमी नीतीवान, सुसंस्कृत आणि चारित्र्यसंपन्न समाजाच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध होती, ती भूमी आज ‘बलात्काराचा देश’, स्त्रियांवर अत्याचार करणार्यांचा देश झाला आहे. देशातील बलात्काराच्या प्रकरणांना अंत नाही. रात्रीच्या अंधारातच नव्हे, तर दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलींवर व महिलांवर विकृत हल्ले होत असतात. जणू शहरांचे आता जंगलांत रूपांतर होत आहे आणि या जंगलात जनावरे मोकाट सुटली आहेत. माणसातील ‘माणूसपण’ नष्ट होऊन माणसे हिंस्त्र श्वापदांनाही लाजवेल असे कृत्य करू लागली आहे.
विदेशी युवतीला अंमली पदार्थ पाजून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या, अनैतिक संबंधातून पित्याकडून मुलीची हत्या, प्रियकराच्या मदतीने महिलेने आपल्या पतीचा काटा काढला, अशा घटना आपण वर्तमानपत्रांतून वाचत असतो. अशा माणुसकीला काळीमा फासणार्या अनेक घटना सर्रास घडत असतात. सतत घडणार्या बलात्कारांच्या घटनेमुळे तरुण मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना वाढील लागणार आहे. अशा घटनांतून समाजाची स्त्रियांबद्दल कशी विकृत मानसिकता पसरत चालली आहे हे उघड झाले आहे. एकाकी स्त्रीचे समाजात अस्तित्व इतके असुरक्षित बनले आहे की, स्त्री जन्म हे महापाप आहे, असेच वाटावे. स्त्रीची शारीरिक कमजोरी, दुर्बलता यामुळे पुरुषी वर्चस्वाला तिला स्विकारावे लागते.
मुख्य बाब म्हणजे विकास आणि जागरूकता या बाबींचा वाढता प्रभाव आजच्या पिढीवर पडत आहे. तरीही बलात्कार आपण टाळू शकत नाही. उलट असल्या घटनांत वाढ होत आहे. बलात्कार म्हणजे एका बलवान व्यक्तीद्वारा कमजोर व्यक्तीवर तिच्या मनाविरुद्ध केलेली बीभत्स अशी हिंसाच आहे. खून करणारा खून करतो. आज बलात्काराला ज्या बळी पडतात, त्यात अल्पवयीन मुलींचा संख्या जास्त आहे. त्यामुळे अनेक संवेदनशील मनांची तडफड चालू असते. परिणामी त्यांची कुटुंबेही मानसिक धक्क्याने उद्ध्वस्त होतात. आज अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाची जी माहिती उघड होते आहे ते थरकाप उडवणारी आहे, कारण जे महाभाग यात सामील असतात त्यांचा कुणालाही संशय येत नाही हीच खरी समस्या आहे. अशांना ओळखणे खूप कठीण असते. ते आपल्यापैकीच एक असतात. त्यांच्यात वेगळेपण असे काहीच नसते. असले नराधम तुमच्या आमच्यात उजळ माथ्याने वावरत असतात. पुरुषत्व गाजवणे आणि मौज मस्ती करणार्याला समाजात मान आहे आणि हीच प्रवृत्ती स्त्रियांना एक उपभोग्य वस्तू समजत आहे.
भारतीय समाजात स्त्रियांचे स्थान उच्च मानले जाते. कुठलेही धार्मिक कार्य स्त्रीच्या सहभागाविना अपुरे असते. प्राचीन साहित्यात असाही उल्लेख आहे की, जिथे महिलांची पूजा होते, तिथे देवदेवता निवास करतात. महिलांच्या बाबतीत असले महान विचार जोपासणार्या आपल्या देशात या महिलांची स्थिती इतर देशांच्या तुलनेत फारच निराशाजनक आहे. ही अतिशयोक्ती मुळीच नव्हे, तर वास्तव आहे. घरात आणि बाहेर दुर्गा, काली, लक्ष्मी आणि सरस्वतीच्या रूपात तिची पूजा होते. मात्र वास्तविक जीवनात ती अपमानित होत आहे.
आज गरजेनुसार अनेक मुली घराबाहेर पडून नोकरी करतात. त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेणारे आहेत. काही जण मोहाला बळी पडतात आणि हा मोहच त्यांना आयुष्यातून उठवितो. भारतात स्त्रियांवर अत्याचार निर्मूलनाचे बरेच कायदे आहेत, परंतु त्यांचा काय फायदा? आज कायदे योग्य रीतीने लागू करण्याची आवश्यकता आहे. बलात्काराच्या कायद्याच्या त्रुटींची दरवेळी यथेच्छ चिरफाड होत असते. त्यामुळे न्याय मिळणार याची खात्री नाही. घोर अन्यायाचे परिमार्जन न्यायव्यवस्थेकडून होईल, यावरचा विश्वास आणि आशा सामान्य माणूस हरवत चालला आहे.
आज तरुण पिढी मोबाईल, इंटरनेटच्या पाशात पार गुरफटून गेलेली आहे. केबल टीव्हीने आजच्या पिढीवर चंगळवादी संस्कृतीचा व ‘इझी मनी’चा परिणाम चालवला आहे. चारित्र्य हा स्त्री आणि पुरुषाचा सर्वांत मोठा दागिना आहे. आज आपण समाजात किंमती दागिने घालून मिरवतो, परंतु काचेसारखा मौल्यवान असा चारित्र्य हा दागिना जपताना तारेवरची कसरत करावी लागते. सतत मोहाच्या क्षणांना आपण बळी पडत असतो. हे सगळे घडते ते बदललेली जीवनशैली, भोगवादाकडे चाललेला कल, सुधारणेच्या नावाखाली रुजत चाललेली विकृती यातून.
ज्या प्रसारमाध्यमांनी समाजाची वैचारिक बांधणी करायची जबाबदारी पेलायची असते, तेच आज चुकीच्या विचारांची पेरणी करीत असतात. अनैतिकतेचे उदात्तीकरण, सुष्ट विचारांऐवजी दृष्ट प्रवृत्तीला खतपाणी घातले जाते. नाटक, वर्तमानपत्र, दूरदर्शन असो, सर्वांची रुची आज अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचली आहे. केवळ माणसातील विकृतीलाच अधिक प्रसिद्धी दिली जाते. स्वामी विवेकानंद, सुभाषबाबू, गांधी-सावरकर यांचे विचार कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आजकाल प्रसारमाध्यमांना रुची नाही. हल्ली दूरदर्शनवरील बहुतांश मालिकांचा काही ठराविक विषय असतो. त्यातील मुख्य पुरुष आणि स्त्रियांचे अनैतिक संबंध, बलात्कार, खून, खंडणी, प्रतिस्पर्धी उद्योग समूहांतील शह-कटशह, लग्नापूर्वीची गर्भधारणा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुलामा चढवून या माध्यमांतून अश्लील, बीभत्स आणि नग्नतेचे प्रदर्शन होताना दिसत आहे. अश्लिलतेचे समर्थन करणार्यांची संख्या वाढत असून त्याला विरोध करणार्यांना वेड्यात काढले जाते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात पालकांनी वेळ काढून मुलामुलीच्या जीवनाची दिशा योग्य आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. सहनशीलता, संयम आणि सहिष्णुता या वृत्ती त्यांच्या अंगात बाणवल्या तरच तरुण पिढीचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. त्याचबरोबर स्त्री स्वातंत्र्याला काही तरी अर्थप्राप्त होईल, नाहीतर पुढे पश्चातापाची पाळी येऊन ठेपेल.