घराणेशाहीच्या आग्रहामुळे कॉंग्रेस विनाशाकडे

0
365
  • दत्ता भि. नाईक

राहुल गांधी सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिलेले असले तरी त्यांची राजकीय क्षेत्रातील पत दिवसेंदिवस कमी होत चाललेली लक्षात येते. अलीकडेच त्यांनी रा. स्व. संघाच्या प्रेरणेतून देशभरात सुरू असलेल्या विद्याभारती संचालित सरस्वती शिशुमंदिरांची तुलना पाकिस्तानमधील मदरशांशी केली आहे.

इंग्रजांनी जाताजाता त्यांची सोय म्हणून का होईना, विभाजित स्वतंत्र भारताची सत्ता पं. जवाहरलाल नेहरू व त्यांचा कॉंग्रेस पक्ष यांच्या हातात सोपवली. १८५७ सारखे दुसरे युद्ध व नामुष्की टाळण्याकरिता त्यांनी ही सोपी युक्ती अमलात आणली होती. समाजवादी विचारसरणीला कवटाळून, स्टॅलिनची पंचवार्षिक योजना राबवून, सामान्य माणसाच्या हिताची जपमाळ घेऊन त्यांचाच घात केला. गांधीजींनी दिलेला साधेपणाचा वसा त्यांनी केव्हाच टाळून दिला. रोज नवीन कडकडीत इस्त्रीचा कुर्ता, छातीवर ताजा लाल गुलाब व तोंडात चिरूट असा या गांधीजींच्या पट्टशिष्याचा पेहराव होता. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरलेली कित्येक घराणी बेचिराख झाली. कित्येकांच्या घरादारांची राखरांगोळी झाली तरीही ‘नेहरू घराण्याने देशासाठी मोठा त्याग केला’ यासारखी वाक्ये सामान्य माणसाच्या मुखातून घोळू लागली. हेच घोषवाक्य कॉंग्रेस पक्षाचा सुरुवातीचा जाहीरनामा होता. तो अनेक वर्षे चालला. पं. नेहरूंनी कॉंग्रेस पक्षाची सूत्रे आपली कन्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या हाती सोपवून पक्षांतर्गत लोकशाही संपवून सत्तेवरची पकड अधिकाधिक घट्ट कशी करता येईल याची व्यवस्था केली.

जी-२३ आणि भगवे फेटे
१९५२, ५७, ६२ पर्यंतच्या सार्वत्रिक निवडणुका कॉंग्रेस पक्षाला सहजपणे जिंकता आल्या. १९६२ च्या चिनी आक्रमणासमोर झालेल्या पराभवामुळे पं. नेहरू फारच अस्वस्थ झाले. १९६४ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्यानंतर पंतप्रधानपदी आलेल्या लाल बहादूर शास्त्री यांनी १९६५ मध्ये पाकिस्तानच्या सेनादलांना खडे चारले, परंतु त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्यानंतर पक्षांतर्गत निवडणुकीमध्ये मोरारजी देसाई यांचा पराभव करून स्व. इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या. १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसला केंद्रात निसटते बहुमत मिळाले व काही राज्यांत कॉंग्रेस सरकारांचा पराभव झाला. यापूर्वीच पं. मदन मोहन मालवीय, आचार्य कृपालानी व चौधरी चरणसिंह यांनी कॉंग्रेसशी काडीमोड घेतला होता. स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये ‘गरीबी हटाव’चा नारा देऊन प्रचंड बहुमत मिळवले. मित्रोखीन पेपर्सच्या अनुसार या निवडणुकीत त्यांनी रशियन गुप्तहेर संघटना के.जी.बी.ची मदत घेतली होती हे सिद्ध झाले आहे. यावरून त्या किती चतूर होत्या व स्वतः गरिबी हटायेंगे असे न सांगता जनतेवरच जबाबदारी टाकण्याच्या बाबतीत किती तरबेज होत्या हे लक्षात येते. त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा स्वार्थापोटी होता व त्यामुळे देशाचे हित साधले असेल तर तो निव्वळ योगायोग आहे.

हा सगळा इतिहास उगाळण्याचे कारण म्हणजे, कॉंग्रेस पक्षाची वंशवादामुळे झालेली घसरण व त्यामुळे पक्षाच्या भवितव्याबद्दल उत्पन्न झालेली चिंतेची स्थिती. स्व. राजीव गांधींच्या चिरंजीवांच्या हातात कॉंग्रेस पक्षाची सूत्रे सोपवण्याच्या अट्टहासापायी पक्षाची उरली-सुरली पत नाहीशी होण्याची शक्यता आहे. काही महिने झाले असतील, कॉंग्रेसमधील तेवीस ज्येष्ठ नेत्यांनी श्रीमती सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले. ‘पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची आवश्यकता आहे’ असा या पत्रातील मजकुराचा अर्थ होता. पूर्णवेळ सक्रिय अध्यक्ष म्हणजेच राहुल गांधी नको असा सूर यातून निघत होता.

फेब्रुवारी महिन्यात जी-२३ म्हणून ओळखले जाणारे व त्यात अजून एकाची भर पडल्यामुळे चोवीस नेते जम्मू येथे कॉंग्रेसचे निवृत्त राज्यसभा खासदार श्री. गुलाब नबी आजाद यांच्या सन्मानासाठी एकत्र जमले होते. सर्वजणांनी डोक्यावर भगव्या रंगाचे फेटे बांधले होते. तिथे जमलेल्यांनी या निमित्ताने जणू बंडाचा झेंडाच उभारल्यामुळे १३५ वर्षांची भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मुळातून हादरली.

राहुल गांधी आणि रा. स्व. संघ
गांधी घराण्याचे युवराज राहुल गांधी हे स्वतःच्या अनभ्यासी वृत्तीमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिलेले असले तरी त्यामुळे त्यांची व पक्षाची पत सतत घसरत चालली आहे. त्यांचे आजोबा व देशाचे प्रथम पंतप्रधान पं. नेहरू यांच्या मनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल द्वेष ठासून भरला होता. १९४८ साली गांधीहत्येचे निमित्त करून त्यांनी रा. स्व. संघावर बंदी घातली. याउलट सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघाच्या कार्यकर्त्यांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले होते. सरदार पटेलांचे १९५० मध्ये निधन झाल्यामुळे हा विषय तसाच थांबला. नेहरूंच्या काळातच १९६३ च्या सव्वीस जानेवारीच्या दिल्लीतील सरकारी संचलनात रा. स्व. संघाच्या पथकाने भाग घेतला होता. १९६५ च्या युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी सुरक्षासंबंधी बैठकीस रा. स्व. संघाचे सरसंघचालक श्री. माधव सदाशिव गोळवलकर (गुरुजी) यांना आमंत्रित केले होते. स्व. इंदिरा गांधींनी आपल्या पित्याच्या संघद्वेषाची परंपरा चालूच ठेवली. संघाच्या स्वयंसेवकांनी स्थापन केलेला भारतीय जनसंघ नावाचा पक्ष १९५० साली अस्तित्वात आला होता. इंदिरा गांधी जिथे जातील तिथे ‘जनसंघ मुझे मारना चाहता है’ असे सांगत फिरत होत्या. १९७५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश मानण्यास नकार देऊन त्यांनी देशात आणीबाणी लादली व हेच निमित्त साधून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. १९७७ च्या निवडणुकीत त्यांचा सपशेल पराभव झाला. १९८० साली त्यांचे पुनरागमन झाले. त्यानंतर त्यांनी रा. स्व. संघाबद्दल एक ‘ब्र’ही काढला नाही. त्यांच्यानंतर राजीव गांधी सत्तेवर आले. त्यांनी संघाबद्दल कसलेही वक्तव्य करण्याचा मोह टाळला व यातच त्यांचा शहाणपणा होता. आता त्यांचे चिरंजीव नेमका हा शहाणपणा सोडून संघाबद्दल बेताल वक्तव्ये करीत आहेत.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील अराजकवादी टुकडे-टुकडे गँगला पाठिंबा देणे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशनिष्ठेबद्दल संशय व्यक्त करणे व त्याचबरोबर कोटावर जानवे धारण करून स्वतः शंभर टक्के हिंदू असा त्याचा देखावा करणे अशा प्रकारचे बालीश चाळे केल्यामुळे राहुल गांधी सतत प्रसिद्धीच्या झोतात राहिलेले असले तरी त्यांची राजकीय क्षेत्रातील पत दिवसेंदिवस कमी होत चाललेली लक्षात येते. आतापर्यंत जे घडले ते कमी होते म्हणून की काय, त्यांनी अलीकडे रा. स्व. संघाच्या प्रेरणेतून देशभरात सुरू असलेल्या विद्याभारती संचालित सरस्वती शिशुमंदिरांची तुलना पाकिस्तानमधील मदरशांशी केली आहे. सरस्वती शिशुमंदिर व विद्या भारतीच्या शाळांमधून दिले जाणारे शिक्षण अतिशय उच्च अशा गुमवत्तेचे असते. विद्या भारतीचे देशातील सहाशे चोवीस जिल्ह्यांमध्ये शाळांचे जाळे आहे. तेवीस हजारहून अधिक शाळांमधून सदतीस लक्ष विद्यार्थ्यांना विद्यादान केले जाते. सुमारे ऐंशी हजारहून जास्त मुस्लीम व ख्रिस्ती विद्यार्थी या शाळांमधून शिकतात. सुसंस्कारांच्या शोधात आपल्या पाल्यांना विद्या भारतीच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालक धडपडत असतात. सुमारे एक लक्ष चाळीस हजार शिक्षक या शाळांमधून विद्यादान करतात. १९५२ मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे संस्थेची प्रथम शाळा सुरू झाली. त्यानंतर देशभर शाळा सुरू करण्यात आल्या. शाळेचे संचालन, अभ्यासक्रम, संस्कार इत्यादी बाबींवर विचार करण्यासाठी वेळोवेळी चिंतन बैठकाही होत असतात. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जात नाही.

यांना आता टॅक्सी पुरेल
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांपासून कॉंग्रेस पक्षाची पिछेहाट सुरू झाली आहे. वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून बैठका घेतल्याने पक्ष वाढणार नाही असे मत भगवे फेटेधारी कॉंग्रेसी बुजुर्गांनी व्यक्त केले आहे. कोणत्याही परिस्थितीत राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसवायचे हे खुशामत करणार्‍या कंपूचे ध्येय आहे व ते दूर सरकताना दिसत आहे. एकेकाळी महाबलाढ्य असलेला हा कॉंग्रेस पक्ष आज घराणेशाहीच्या आग्रहामुळे दुबळा बनत चालला आहे. श्रीमती सोनिया गांधी तसेच युवराज राहुल यांच्यावर डेक्कन हेराल्डच्या बाबतीत आर्थिक घोटाळ्याचा खटला चालू आहे हेही या ठिकाणी विसरून चालणार नाही. दहा वर्षे सत्तेच्या बाहेर राहिल्यानंतर कॉंग्रेस पक्ष स्वबळावर उभा राहू शकत नाही. बंगालमध्ये डाव्या पक्षांशी, आसाममध्ये बांंगला देशी घुसखोरांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी खटपट करणार्‍या ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटशी तर केरळमध्ये कम्युनिस्टविरोधी आघाडी बनवून, मुस्लीम लीगशी समझोता करून हा पक्ष विधानसभा निवडणुका लढवत आहे. असे केल्याने पक्षाची अधिकाधिक घसरण होत जाणार आहे हे निश्‍चित आहे. २०१९ च्या निवडणूक निकालाने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला. आज पक्षाचे सर्व खासदार एका बसमध्ये मावतील इतके आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर यांची संख्या एखाद्या टॅक्सीमध्ये मावण्याइतकी तर होणार नाही ना याची भीती वाटते. एकदा घर फिरले की वासेही फिरतात अशी म्हण आहे. परंतु कॉंग्रेस पक्ष आता विनाछप्पराचा झालेला आहे. त्यामुळे घर कोसळणार म्हटले तर घर मुळात आहेच कोठे असा प्रश्‍न उपस्थित राहतो. सुदृढ लोकशाहीसाठी बलवान विरोधी पक्षाची आवश्यकता असते. एकपक्षीय हुकूमशाहीचे भूत मानगुटीवर बसलेल्या कॉंग्रेस पक्षाने विरोधी पक्षांना संपवण्याचा चंगच बांधला होता. याचा परिणाम उलटा होऊन ज्यांचा सतत तिरस्कार केला तेच आता सत्तेवर ठाण मांडून बसलेले दिसून येतात. एखादी विचारसरणी वा संघटना संपायला आली की ती स्वतःच्या वजनाखाली कोसळली असे म्हणण्याचा प्रघात आहे. परंतु स्वतःच्या वजनाखाली कोसळण्यासाठी काहीतरी वजन असणे आवश्यक आहे. आजच्या घडीला तेवढ्याही वजनाची कॉंग्रेसजवळ वानवा आहे हे उघड सत्य आहे. राहुल गांधींचे वागणे पक्ष कोसळण्याच्या प्रक्रियेला अधिक गतिमान करेल याबद्दल शंका नाही.