घरचा संघर्ष

0
25

राजकारणापोटी घरे फुटत असतील तर ती सर्वांत खेदजनक बाब ठरते. परंतु देशाच्या राजकीय इतिहासामध्ये तशी असंख्य उदाहरणे आहेत. मुलायमसिंग यादव आणि अखिलेश किंवा यशवंत सिन्हा आणि जयंत सिन्हा या पिता पुत्रांतील संघर्ष ही अलीकडची उदाहरणे. गोव्याच्या राजकारणाचे पितामह म्हणता येतील असे प्रतापसिंह राणे आणि पुत्र विश्वजित यांच्यात सध्या जो राजकीय संघर्ष उफाळला आहे तो याच जातकुळीतला आहे की निव्वळ देखावा आहे? पर्ये मतदारसंघातून आपण कॉंग्रेसच्या तिकिटावर येती निवडणूक लढणार असल्याची घोषणा काल प्रतापसिंह राणेंनी स्वतःहून केली. त्यावर, आता त्यांनी निवृत्ती घ्यावी, त्यांच्या पर्ये मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आपण लढणार आहोत असे त्यांचे पुत्र विश्वजित यांनी जाहीर केले आहे. वडिलांचे वय आज ८३ वर्षे आहे. या वयात त्यांना ही निवडणूक लढणे झेपणार आहे का, मतदारसंघात ते पूर्वीसारखे फिरू शकतील का, सद्यपरिस्थितीत ते पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री बनू शकणार आहेत का, असे प्रश्न विश्वजित यांनी उपस्थित केले आणि त्याऐवजी वडिलांनी सन्मानाने राजकारणातून निवृत्ती स्वीकारावी असेही ते म्हणाले. ‘‘राणे यांची विधानसभेतील पन्नास वर्षांची कारकीर्द झाली आहे. हे त्यांचे निवृत्तीचे वय आहे. त्यामुळे सध्याच्या राजकारणात दुय्यम स्थानासाठी त्यांनी राजकारणात सक्रिय न राहणेच खरे तर त्यांच्या आजवरच्या प्रतिष्ठेला धरून ठरेल. योग्य निर्णय घेण्यास ते समर्थ आहेतच’’ असे आम्ही कालच्याच अग्रलेखात म्हटले होते, परंतु आम्ही म्हटले होते ते गोव्याच्या सध्याच्या एकूण राजकारणाची खालावलेली पातळी विचारात घेऊन. विश्वजित यांना त्यासाठी वडिलांनी निवृत्ती घेतलेली नको आहे. विश्वजित वाळपईऐवजी यावेळी पर्ये मतदारसंघातून लढणार आहेत, याचा अर्थ वाळपईच्या अधिक सुरक्षित मतदारसंघातून त्यांना आपल्या पत्नीला निवडून आणायचे आहे. त्यामुळे पर्येतून ते स्वतः लढू इच्छित आहेत आणि त्यासाठीच त्यांना वडील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नको आहेत. म्हणजे विश्वजित यांच्या सदर भूमिकेमागे वडिलांच्या सन्मानापेक्षा राजकीय स्वार्थ अधिक दिसतो. विश्वजित यांच्या पत्नीला भाजप आपली उमेदवारी देणार नाही, परंतु सत्तरी युवा मोर्चाच्या माध्यमातून त्या उभ्या राहतील आणि भाजप त्यांना छुपा पाठिंबा देईल असे एकूण वाळपईतील चित्र आहे.
गेली वीस वर्षे आपणच त्यांना निवडून आणतो आहोत असेही विश्वजित बोलून गेले. विश्वजित हे जर भाजपचे आमदार असतील, तर पर्येत ते कॉंग्रेसच्या उमेदवारासाठी काम करीत आले आहेत अशी कबुलीच त्यांनी यातून दिलेली आहे. पर्ये मतदारसंघात सगळे पंच, सरपंच आपण निवडून आणले आहेत येथवर त्यांचे म्हणणे ठीक आहे, परंतु गेली वीस वर्षे वडिलांना आपणच निवडून आणत आहोत असा जर दावा ते करणार असतील तर त्याची चिकित्सा होणे जरूरी आहे. ७२ पासून राजकारणात सक्रिय असलेल्या प्रतापसिंह राणेंची राजकीय पुण्याई काही एवढी लेचीपेची खचितच नसेल. किंबहुना विश्वजित यांना राजकारणात रांगता आले ते पित्याच्याच राजकीय पुण्याई व लोकसंपर्कावर. पर्ये हा आजवर प्रतापसिंह यांचा बालेकिल्ला होता. २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकांत त्यांचा सामना तेव्हा भाजपमध्ये असलेल्या आणि आता आम आदमी पक्षात गेलेल्या विश्वजित कृष्णराव राणेंशी झाला होता. त्या दोन्ही निवडणुकांचा निकाल तपासला तर दिसेल की विश्वजित कृ. राणे यांनी सालेली आणि शेजारच्या होंडा, भुईपाल, नारायणनगरमध्येच नव्हे, तर अगदी पर्ये, बेलवाडा (पश्चिम), सोलये, गोळावली आदी केंद्रांवर प्रतापसिंह राणेंवर मोठी आघाडी घेतली होती. २०१२ च्या निवडणुकीत तर अडवय, खोडये, पिसुर्लेमध्येही त्यांची मतसंख्या प्रतापसिंह राणेंपेक्षा अधिक होती. शिवाय दोन्ही निवडणुकांत बहुतेक मतदानकेंद्रांवर लढत तुल्यबळ झाली होती. प्रतापसिंह राणे त्या दोन्ही निवडणुका जिंकले ते मुख्यत्वे मोर्ले, पुनर्वसन वसाहत, घोटेली, शिरोली, केरी आदी ठिकाणी झालेल्या भरघोस मतदानाच्या बळावर. प्रतापसिंह राणे जरी गोव्याच्या राजकारणातले पितामह असले तरी पर्येतील ह्या दोन्ही निवडणुका एकतर्फी झालेल्या नव्हत्या हे लक्षणीय आहे. मात्र, विश्वजित प्र. राणे भाजपात आले आणि विश्वजित कृ. राणे यांचे हे सर्व प्रयत्न पाण्यात गेले. प्रतापसिंह राणे यांनी वेळीच राजकारण संन्यास घेतला असता तर कॉंग्रेस तेथे एखादा पर्यायी उमेदवार तयार करू शकला असता. परंतु आता पर्येच्या उमेदवारीवर दावा करून शेवटच्या क्षणाला जर त्यांनी उद्या माघार घेतली, तर त्याचा अर्थ पुत्र विश्वजित यांना मैदान मोकळे करून दिल्यासारखे ठरेल. ते अशी माघार घेणार की मुलाविरुद्ध लढून विजय संपादन करून आपली प्रतिष्ठा राखणार?