घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज एका सिलिंडरची किंमत कॉंग्रेसच्या काळातील दोन सिलिंडरच्या किमतीएवढी आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबांच्या भल्यासाठी फक्त कॉंग्रेस पक्षच काम करतो. हाच पक्षाच्या आर्थिक धोरणाचा गाभा आहे, असे ट्विट करत राहुल गांधींनी केंद्रावर टीका केली आहे.
राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये घरगुती सिलिंडरच्या किमतींची तुलना केली आहे. कॉंग्रेसच्या काळात २०१४ पर्यंत एलपीजी सिलिंडरची किंमत ८२७ रुपये अनुदानासह ४१० रुपये होती, तर २०२२ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ती ९९९ रुपयांपेक्षा जास्त आहे आणि सबसिडी देखील शून्य आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यामध्ये ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी २२ मार्चला इंधन विक्री करणार्या कंपन्यांनी ५० रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढविले होते, तर मे महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १०२.५० रुपयांनी वाढविले होते.