‘असनी’ वादळामुळे राज्या उद्यापासून पावसाची शक्यता

0
25

>> ओडिशा, पश्‍चिम बंगाल, आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस बरसणार

ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमधील वेगवेगळ्या भागात मंगळवारपासून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ‘असनी’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच गोव्यात देखील काही प्रमाणात असनी वादळाचा परिणाम जाणवणार आहे. राज्यातील वातावरण आगामी चार-पाच दिवस ढगाळ राहणार असून, येत्या १० ते १२ मे दरम्यान राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता येथील हवामान विभागाने वर्तवली आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला बंगालच्या उपसागरात ‘असनी’ चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. हिंदी महासागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. परिणामी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर जोरदार वारे आणि पाऊस पडण्यास सुरुवात झाली होती. आता हे असनी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

असनी चक्रीवादळ अंदमान द्वीपसमूहच्या पश्चिमेला सुमारे ३८० किलोमीटर वायव्येकडे सरकत असल्यामुळे पुढील २४ तासांत पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने रविवारी बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात असनी चक्रीवादळाची पुष्टी केली. असनी चक्रीवादळ सोमवारी सकाळपर्यंत दोन टप्प्यांनी आणखी तीव्र होणार आहे. ते एक अतिशय तीव्र चक्रीवादळामध्ये मजबूत होऊन पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात राहण्याची शक्यता आहे. हे वादळ मंगळवारपर्यंत आंध्र प्रदेश-ओडिशा किनारपट्टीजवळ पोहोचेल.

मंगळवारी संध्याकाळी पावसाला सुरुवात होईल. ओडिशातील गजपती, गंजम आणि पुरी या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुधवारसाठी जगतसिंगपूर, पुरी, खुर्दा, कटक आणि गंजम या पाच जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

बुधवार आणि गुरुवारी पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मंगळवार आणि बुधवारी आंध्र प्रदेशातही जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशा व्यतिरिक्त, बिहार, झारखंड, सिक्कीम, आसामसह अनेक राज्यांमध्ये असनीचा प्रभाव दिसेल. हवामान खात्याने या राज्यांसाठी पावसाचा यलो अलर्टही जारी केला आहे.
दरम्यान, यापूर्वी असनी चक्रीवादळ ओडिशा किंवा आंध्र प्रदेशात धडकणार नाही; परंतु किनारपट्टीला समांतर जाईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला होता.

वादळाची दिशा बदलू शकते

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० मे रोजी ओडिशातील पुरी-गंजामच्या समुद्रकिनार्‍यांवर हे वादळ धडकू शकते. वादळादरम्यान वार्‍याचा वेग १२५ किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो. वादळ सध्या बंगालच्या उपसागरात उच्च दाबाखाली आहे. काही तासांत वादळाची दिशाही बदलू शकते आणि ते ओडिशाच्या ऐवजी बंगालच्या कोणत्याही किनारपट्टीला धडकू शकते.

गोव्यावर जास्त परिणाम नाही

बंगालच्या उपसागरात अंदमाननजीक कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे निर्माण झालेले हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने आंध्रप्रदेश, ओडिसा, पश्‍चिम बंगालच्या दिशेने सरकत आहे. या वादळाला असनी असे नाव देण्यात आले असून, या वादळाचा गोव्यावर जास्त परिणाम होणार नाही. मात्र, काही भागात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.