नादुरुस्त कदंब बसगाड्यांमुळे प्रवासी हैराण

0
40
  • >> सावईवेरे-फोंडा मार्गावर आणखी एक कदंब बस पडली बंद

कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्या देखभालीअभावी वाटेत नादुरुस्त होण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात मागील तीन दिवसात कदंब महामंडळाच्या तीन बसगाड्या वाटेत नादुरुस्त झाल्याचे प्रकार घडले. मागील दोन दिवसांतील प्रकारानंतर काल सावईवेरे-फोंडा मार्गावर कदंब बस वाटेतच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांत नाराजीचे वातावरण आहे.

कदंब वाहतूक महामंडळ हे राज्यातील नागरिकांना वाहतूक सेवा उपलब्ध करणारे प्रमुख महामंडळ आहे. या महामंडळाकडे पाचशेच्या आसपास बसगाड्या आहेत. कदंबच्या बसगाड्यांची देखभाल करण्यासाठी खास विभाग कार्यरत आहे, तरीही कदंबच्या बसगाड्या प्रवासी वाहतूक करताना वाटेत नादुरुस्त होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. कदंबच्या बसगाड्यांची योग्य देखभाल केली जात नसल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.
गेल्या शुक्रवार ६ मे रोजी सावईवेरे ते फोंडा या प्रवासी मार्गावर वाहतूक करणारी कदंब बसगाडी वाटेत बंद पडली. सदर बसगाडीत डिझेल नसल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी कदंब बसच्या चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शनिवार ७ मे रोजी संध्याकाळी बदामी ते पणजी या आंतरराज्य मार्गावर प्रवासी वाहतूक करणार्‍या कदंब बसगाडीचे मागील दोन टायर बाहेर आल्याची घटना घडली. सुदैवाने हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना धुळेर म्हापसा येथे घडली होती.

हे दोन प्रकार घडल्यानंतर रविवारी सावईवेरे ते फोंडा या मार्गावर वाहतूक करणारी कदंब बसगाडी वाटेत नादुरुस्त झाली. सातत्याने वाटेत बंद पडणार्‍या बसगाड्यांमुळे कदंबचे प्रवासी संतापले असून, कदंबच्या बसगाड्यांच्या देखभालीकडे गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.