ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सहा दिवसांत ४७२४ अर्ज

0
15

>> उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार २५ जुलै २०२२ हा अंतिम दिवस आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मागील सहा दिवसांत ४७२४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंंडपीठाने ग्रामपंचायत निवडणूक जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार घेण्यास मान्यता दिली आहे. ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्यात आलेल्या पाच ग्रामपंचायतींना न्यायालयाचा अंतिम निवाडा लागू होणार आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ यावेळेत मतदान घेतले जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेतले जाणार आहे. राज्यातील निवडणूक होणार्‍या १८६ ग्रामपंचायतींमध्ये एकूण १५२८ प्रभाग आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास १८ जुलैपासून प्रारंभ झाला आहे. पेडणे तालुक्यातील १७ ग्रामपंचायती, सत्तरीतील १२ ग्रामपंचायती, डिचोलीतील १७ ग्रामपंचायती, बार्देशतील ३३ ग्रामपंचायती, तिसवाडीतील १८ ग्रामपंचायती, फोंड्यातील १९ ग्रामपंचायती, सासष्टीतील ३३ ग्रामपंचायती, सांगेतील ७ ग्रामपंचायती, धारबांदोड्यातील ५ ग्रामपंचायती, काणकोणातील ७ ग्रामपंचायती, केपेतील ११ ग्रामपंचायती तर मुरगावातील ७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे.

उद्या अर्जांची छाननी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दाखल करण्यात येणार्‍या उमेदवारी अर्जांची उद्या मंगळवार २६ जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून छाननी केली जाणार आहे. बुधवार २७ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेेळेत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.