गोव्यात ५ वाघांची नोंद

0
83

पश्‍चिम घाटात ७७६ वाघांचा संचार
भारतात वाघांची संख्या ३० टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल काल केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आला असून सदर अहवालात गोव्यात ५ वाघांचा संचार असल्याचे म्हटले आहे. यामुळे गोव्यातील व्याघ्र व पर्यावरणप्रेमींनी आनंद व्यक्त केला असून गोवा ही व्याघ्रभूमी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचे म्हटले आहे.गोवा सरकारने गोव्यातील वाघांच्या अस्तित्वाबाबत सातत्याने दुर्लक्ष केले आहे. पर्यावरणप्रेमींनी सातत्याने गोव्याच्या चारही अभयारण्य परिसरात वाघांचा संचार असल्याचे वारंवार सांगितले. मात्र, राज्य सरकारने सातत्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचे प्राणी मित्र अमृतसिंग म्हणाले. काल गोव्यात किमान ५ वाघांचे वास्तव्य असल्याचे सिद्ध झाल्याने गोव्याच्या जंगलाची श्रीमंती वाढलेली असून आता व्याघ्र क्षेत्र घोषित करण्याच्या मागणीला जोर धरणे अधिक शक्य होणार असून आतातरी राज्य सरकारने गोव्यातील वाघांच्या अस्तित्वाची जाणीव मान्य करून त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी वन्यजीव संरक्षक केंद्रीय समितीचे सदस्य राजेंद्र केरकर यांनी केली आहे.
गेले पाव शतक गोव्यात वाघाचे अस्तित्व असल्याचे वारंवार सांगूनही व अनेक पुरावे देऊनही हा प्रश्‍न सरकारने गंभीरतेने घेतलेला नाही असे ते म्हणाले. केंद्रातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात देशात वाघांची संख्या ३० टक्क्यांनी वाढलेली असून २०१० सालात १७०६ वाघांची संख्या २०१४ सालात वाढून २२२६ झाल्याने भारताच्या जंगलात समृद्धीला बळकटी आली असून जगाच्या तुलनेत ७० टक्के वाघ भारतात असल्याचे सिद्ध झाल्याचे केरकर यांनी सांगितले.
व्याघ्र गणनेच्या प्रक्रियेत ३ लाख ७८ हजार ११८ चौरस किलोमीटर क्षेत्रातील १८ व्याघ्र असलेल्या राज्यात सर्व्हेक्षण करण्यात आले. १५४० वाघांची छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
कर्नाटक, उत्तराखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू, केरळ आदी राज्यांत ही संख्या वाढल्याचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. पश्‍चिम घाट परिसरात तब्बल ७७६ वाघांची नोंद झाल्याने हा परिसर समृद्ध असल्याचे सिद्ध झालेले असून गोव्यात वाघांचा नियमित असणार्‍या संचारावर शिक्कामोर्तब झाले आहे.
भारतात वाघांच्या संख्येत ३०% वाढ
नवी दिल्ली : २०१४ मध्ये केलेल्या गणनेनुसार देशात वाघांची संख्या २२२६ एवढी वाढली असून ही वाढ ३० टक्क्यांनी आहे. सन २०११ मध्ये वाघांची संख्या १७०६ इतकी होती. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. भारतात ७०% वाघ असून ही आनंदाची बाब असल्याचे मंत्री म्हणाले. कर्नाटकमध्ये ३४० इतकी वाघांची सर्वाधिक संख्या आहे. तमिळनाडूत २२९, मध्य प्रदेशात २०८, महाराष्ट्रात १९० व बंगालमधील सुंदरबन येथे ७६ वाघ असल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.